पणजी (नारायण गावस): राज्यात वाढती डायलेसिसवरील रुग्णांची संख्या चिंताजनक असून प्रती दिन १ ते २ रुग्ण डायलेसिसवर जात आहेत. राज्यातील बाराही तालुक्यामधील डायलसिस केंद्र फुल झाली आहेत, अशी चिंता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. मारियाे सिक्वेरा यांच्या ‘अ रोड मॅप टू लोन्जविटी’ या निरोगी आरोग्याचा मंत्र असलेल्या पुस्तक प्रकाशनाला ते प्रमुख पाहूणे म्हणून बाेलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पर्यावरण मंत्री अलॅक्स सिक्वेरा उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले वाढत्या डायबिटीसमुळे आता हळूहळू डायलेसिसचे रुग्णही वाढत आहे. २० वर्षात राज्यात फक्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डायलेसिस केले जात होते आता बाराही तालुक्यातील आरोग्य केंद्रात हे सुरु केले असून सर्वच केंद्र फुल आहेत. ही चिंता करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी आता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कितीही व्यस्त असलो तरी आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे.
मुख्यमंत्री म्हणाले, आपण शारीरिक सुदृढ प्रमाणे मानसिक सदृढ असणे गरजेचे आहे. अनेक आजार हे मानसिक राेगामुळे होत असतात. डायबिटीस रक्त दाब हे प्रमुख आजार वाढत आहेत. भारत हा जगातील सर्वात जास्त डायबेटिक रुग्णांनी भरलेला आहे. त्यामुळे निराेगी आरोग्याची मंत्र जपायला पाहिजे. यासाठी आता जगभर लाेकांनी याेगाला आत्मसात केले आहे. आज जगात याेग दिनाचा मुख्य उद्देश हा निरोगी जीवन आहे. त्यामुळे फक़्त एकाच दिवशी याेग न करता प्रत्येक दिवशी योग केला पाहिजे.
मंत्री अलॅक्स सिक्वेरा म्हणाले, ‘अ रोड मॅप टू लोन्जविटी’ हे पुस्तक निरोगी आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन ठरणार आहे. अनेक लोकांना आता विविध आजार जडत आहेत. लोकांना आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा पुस्तकांतून जागृती हाेण्यास मदत होत असते.