- सदगुरू पाटील
पणजी : केवळ पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात विवाहित महिला आणि युवती यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढू लागले आहे. सरकारलाही वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता वाटू लागली आहे. मोबाईल देण्याची मागणी वडिलांनी पूर्ण न केल्यामुळे रागाने 17 वर्षीय युवतीने आत्महत्या करण्याची घटना बुधवारी न्हावेली-साखळी या शहरात घडली. वैशाली नाईक असे मयत युतीचे नाव आहे. तिने स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेनंतर गोव्यातील वाढत्या आत्महत्यांचा विषय नव्याने चर्चेत येऊ लागला आहे.
राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत गोव्यातील तीन वेगवेगळ्या गावांमध्ये तीन नवविवाहितांनी आत्महत्या केली आहे. या शिवाय दोघा युवतींच्या आत्महत्या झाल्या आहेत. सत्तरी, फोंडा, तिसवाडी, काणकोण, सासष्टी अशा तालुक्यांत आत्महत्या झाल्या आहेत.
राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात आत्महत्यांचे सरासरी प्रमाण जास्त आहे, असे कुज ह्या गोव्यातील निमसरकारी संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणी व अभ्यासात आढळून आले आहे. राष्ट्रीय स्तरावर आत्महत्याचे सरासरी प्रमाण 1 लाख लोकसंख्येमागे 11.7 आत्महत्या असे आहे. गोव्यात हेच सरासरी प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे 15.8 असे आहे अशी नोंद मानसोपचार तज्ज्ञ व कुज एनजीओचे संचालक डॉ. पीटर कास्टेलिनो यांनी केली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार गेल्या नऊ महिन्यांत दीडशेहून जास्त आत्महत्यांची नोंद झाली आहे. जून महिन्यापर्यंत सहा महिन्यांत 133 आत्महत्या झाल्या. गेल्या तीन वर्षांत गोव्यात एकूण 1 हजार दहा व्यक्तीनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. यात अनेक महिला व अविवाहित मुली आहेत. एकूण आत्महत्यांपैकी 25 टक्के आत्महत्या ह्या नैराश्य व तणावामुळे झाल्याची नोंद सरकारने केली आहे.
वार्षिक सरासरी तीनशे आत्महत्यांची नोंद गोव्यात होऊ लागली आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी वाढत्या आत्महत्त्यांविषयी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा आपल्याला अधिक चिंतेचा विषय वाटतो असे ते म्हणाले. कुटुंबातील छळ, प्रेमभंग, मानसिक आरोग्याची समस्या अशा काही कारणास्तव युवती व नवविवाहितांच्या आत्महत्या होऊ लागल्या आहेत.