पणजी : आमचा सहकारी पक्ष आम्हाला सोडून गेला. तो पक्ष आम्हाला दोष देत आहे. त्यांना मोठी स्वप्ने पडत आहेत. मोठी स्वप्ने पाहण्यापूर्वी अगोदर पक्षाचा पाया व्यापक करा, असा टोला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मगो पक्ष व त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांना लगावला. मुख्यमंत्र्यांनी कुणाचे नाव घेतले नाही; पण ते मगोपबाबत व ढवळीकरांविषयी बोलत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. पणजीत भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी पर्रीकर, विनय तेंडुलकर, भाजप नेत्या तथा अभिनेत्री तारा यांच्या उपस्थितीत भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचा सहकारी पक्ष सोडून जाताना आम्हाला दोष दिला जातो. त्यांनी नेहमी सोयीचेच राजकारण केले. मोठी स्वप्ने दिसू लागल्यानंतर ते गेले. मोठी स्वप्ने पाहायला काहीच हरकत नाही; पण त्यासाठी पक्षाचा पाया वाढवावा लागतो. पार्सेकर म्हणाले की, भाजप स्वबळावर २६ जागा जिंकणार आहे. आमचे २६ आमदार निवडून येतील. भाजपकडे स्पष्ट बहुमत असेल. भाजपचे निवडणूक प्रचार कार्यालय हे तळमजल्यावर आहे. आम्हाला तळमजल्यावरून स्थानिक समस्या कळतील. आम्ही अनेक कामे गेल्या पाच वर्षांत पूर्ण केली, जी झाली नाही ती येत्या पाच वर्षांत करू. या वेळी पर्रीकर व अभिनेत्री तारा यांचेही भाषण झाले. पर्रीकर म्हणाले की, प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठीच आम्ही लढणार आहोत. ३५ मतदारसंघांमध्ये भाजपचे महामेळावे झाले. या वेळी सदानंद शेट तानावडे यांनी सूत्रनिवेदन केले. (खास प्रतिनिधी)
अगोदर शक्ती वाढवा; मग स्वप्ने पाहा : पार्सेकर
By admin | Published: December 31, 2016 3:14 AM