पणजी : राज्यातील अनुसूचित जातींमधील (एससी) लोकांनी खूप मोठा त्याग केला आहे. अनुसूचित जमातींपेक्षाही (एसटी) जास्त त्याग एससी लोकांनी केलेला असतानाही सरकारने यापूर्वीच्या काळात त्यांच्या आरक्षण कोट्यात कपात केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनुसूचित जातींना हा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.येथील आंबेडकर उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा शासकीय सोहळा शुक्रवारी पार पडला. त्या वेळी आजगावकर म्हणाले, की गोव्यातील अनुसूचित जातींवर नेहमीच अन्याय होत आला आहे. अन्य समाजांनी त्यांच्यावर अन्याय केला. अनेक अत्याचार त्यांनी सोसले. मात्र, कधीच स्वत:चा हिंदू धर्म सोडला नाही. अन्य समाजांसाठी अनुसूचित जातींचा आरक्षण कोटा कमी करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला. विद्यमान मुख्यमंत्री पर्रीकर हे हुशार आहेत. ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी तोडगा काढावा. मंत्री आजगावकर यांनी एससी समाजातील अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या भाषणावेळी सांगितले, की मी कुणावरच अन्याय होऊ देणार नाही. कधीही कुणी जर माझ्या नजरेस विषय आणून दिला तर मी तोडगा काढीन. कुणीही मला पत्र लिहून पाठवावे. पत्राची दखल घेऊन पावले उचलीन. मुख्यमंत्री म्हणाले, की शिवाजी महाराज हे माझे गुरू आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. ज्यांनी आपल्याला मते दिली नाहीत, त्यांची देखील कामे करतो. जातीवरून फरक करत नाही. मी प्रत्येकाची कार्यक्षमता पाहतो. जे अधिकारी आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आले, त्यापैकी अनेकजण खरेच हुशार आहेत. याचाच अर्थ असा की, हुशारी व बुद्धी ही कोणत्या तरी एकाच समाजाकडे असते असे नाही. प्रत्येकाला जर संधी मिळाली तर, ज्ञान व बुद्धीद्वारे चमक दाखविता येते. मला आडनावांवरून अनेकवेळा कुणाची जात देखील कळत नाही. मला त्यात स्वारस्यही नाही. मुख्यमंत्री म्हणाले, की आंबेडकरांना देवत्व देणाऱ्यांनी त्यांचे गुण आत्समात करावेत. त्यांच्या गुणांना देवत्व द्यावे. आंबेडकर हे महानच होते. त्यांची महानता मला दिल्लीत गेल्यानंतर आणखी जास्त प्रमाणात कळाली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून मला आंबेडकरांविषयीची जास्त माहिती प्राप्त झाली. ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांचे या वेळी भाषण झाले. पतंगे यांनी आंबेडकर यांचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले. या वेळी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हेही व्यासपीठावर होते. सूत्रनिवेदन डॉ. दयानंद राव यांनी केले. (खास प्रतिनिधी)
अनुसूचित जातींचा आरक्षण कोटा वाढवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 2:03 AM