वास्को: दक्षिण गोव्यातील वास्को शहरात व जवळपासच्या परिसरात डेंग्यू झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांत वाढ होत आहे. डेंग्यूला लगाम घालण्यासाठी शहरी आरोग्य खाते, मुरगाव नगरपालिका तसेच इतर संबंधित यंत्रणा कोणती काळजी घेत आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच जुलै व ऑगस्ट या महिन्यात डेंग्यूचा संश्य असलेले १११ रुग्ण सापडल्याने या दोन महिन्याच्या काळात वास्कोतील दोन तरुणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने नागरिकांत भीती आहे.
माल्कम डायस या २२ वर्षीय तरुणाचा १७ ऑगस्टला डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या नंतर नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात डेंग्यूग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. त्याचप्रमाणे तपासणी सुविधा या इस्पितळात उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली होती.
तसेच जुलै महिन्यात डेंग्यूचे ४६ व ऑगस्ट मध्ये ६५ रुग्ण संशयित रुग्ण आढळल्याची माहिती वास्को आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ. रश्मी खांडेपराकर यांनी दिली. वास्को शहरातील नवेवाडे, व्होळांत, मेस्तावाडा या भागात अधिकाधिक रुग्ण सापडलेले असून याव्यतिरिक्त बायणा, बोगदा, वाडे अशा अन्य भागात रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी वास्को आरोग्य खाते सर्व प्रकारची काळजी घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, अनेक भागात नागरिक सहकार्य करत नसल्याने अडचणी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
विविध ठिकाणी नागरिक पाणी बॅरलमध्ये भरल्यानंतर उघडे ठेवत असल्याचे दिसून आले असून यात डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले आहे. नवेवाडे, बायणा अशा वास्कोतील विविध भागात घराबाहेर ठेवलेल्या झाडांच्या कुंडयात पाणी साचून येथे डासांची पैदास होत असल्याचे दिसून आले आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास वास्को आरोग्य खात्याचेअधिकारी योग्य पाऊले उचलत असल्याची माहिती डॉ. खांडेपारकर यांनी दिली. तसेच मुरगाव नगरपलिकेचे मुख्याधिकारी गौरिश शंखवाळकर म्हणाले, पालिकेने औषधांची फवारणी मारण्यात येत आहे. दरम्यान, चिखली उपजिल्हा इस्पितळात डेंग्यू संदर्भातील चाचणीसाठी रक्त तपासणी करण्याची सुविधा नुकतीच उपलब्ध केल्याची माहिती इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.