पणजी : गोव्यात अवयव दानाविषयी बरीच जागृती होऊ लागली आहे. अधिकाधिक लोक देहदान, अवयव दान याविषयी बोलू लागले आहेत. देहदानाच्या घोषणाही सोशल मीडियावरून होऊ लागल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) यापुढे यकृत रोपणाची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने चालवला आहे.
गोव्यातील मणिपाल इस्पितळात नुकतेच ब्रेन डेड व्यक्तीचे यकृत व किडणी काढून त्याचे रोपण दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात करण्यासाठी हे अवयव खास चार्टर विमानाने मुंबईला नेण्यात आले. मुंबईतील ग्लोबल इस्पितळातील रुग्णाच्या शरीरात त्याच दिवशी गोमंतकीय रुग्णाच्या यकृताचे रोपण करण्यात आले. मणिपालमधील ज्येष्ठ डॉक्टर शेखर साळकर लोकमतशी बोलताना म्हणाले, की बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात महिन्याला आठ- दहा तरी ब्रेन डेड रुग्ण असतात, त्यांचे अवयव काढून ते दुस:या रुग्णाच्या शरीरासाठी रोपण करण्याकरिता वापरण्याचा प्रयत्न झाला तर अनेकांना जीवदान मिळेल. सध्या गोमेकॉत सुविधा नसल्याने ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव वापरता येत नाहीत.
आरोग्य मंत्री विश्वजित राणो लोकमतशी बोलताना म्हणाले, की येत्या दोन महिन्यांत गोमेकॉत काही सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. किडणी रोपणाच्या शस्त्रक्रिया गोमेकॉ इस्पितळात केल्या जातात. आतापर्यंत सोळा शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. मात्र ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव काढणे व त्याचे रोपण दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात करणे अशी व्यवस्था आमच्याकडे नसली तरी, नजिकच्या काळात ती होणार आहे. यकृत रोपणाची शस्त्रक्रिया गोमेकॉत यशस्वी पद्धतीने करता यावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. या कामासाठी गोव्याबाहेरील एखाद्या इस्पितळाशी करार करण्याचीही सरकारची तयारी आहे.
गोव्यातील सदाशिव राव हा 60 वर्षीय रुग्ण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याची दोन्ही मूत्रपिंडे मणिपाल इस्पितळात काढली गेली. हे काम परळ- मुंबईतील ग्लोबल इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक गोव्यात आले होते. त्यांनी मूत्रपिंडे व यकृत काढून ते मुंबईला नेले. एकदा ब्रेन डेड रुग्णाचे मूत्रपिंड काढल्यानंतर 72 तासांत त्याचे रोपण दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात करणे गरजेचे असते. एक मूत्रपिंड जसलोक इस्पितळात तर दुसरे मुंबई इस्पितळासाठी देण्यात आले. याविषयीचे वृत्त फेसबुक व अन्य सोशल साईट्सद्वारे सगळीकडे पोहोचल्यानंतर अनेक गोमंतकीयांनी आपली देहदान करण्याची तसेच ब्रेन डेड झाल्यास अवयव दान करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले.
दरम्यान,मुंबईतील ग्लोबल इस्पितळात यकृत रोपणाच्या वार्षिक 80ते 100 शस्त्रक्रिया होत असतात. त्यापैकी 30 टक्के यकृत हे ब्रेन डेड व्यक्तीचे असते, असे ग्लोबल इस्पितळाचे शल्यविशारद प्रशांत राव यांनी लोकमतला सांगितले.