पणजी : गोव्यातील अनेक आमदार, मंत्री आदींच्या आरोग्याविषयी तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही आमदारांना तर मोठ्या शस्त्रक्रियांनाही सामोरे जावे लागू लागले आहे. बदलती जीवनशैली, राजकारणातील तणाव, नेहमीची व्यस्तता, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणास्तव मंत्री, आमदार आजारी पडू लागले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गेले तीन महिने सरकारी कार्यालयात जाऊ शकलेले नाहीत. ते उपचारच घेत आहेत. तत्पूर्वी त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अडीच महिने परदेशात होते. त्यांच्यावरही परदेशात उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक असली तरी, त्यांना दुस-याचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही.
भाजपाचे वास्कोचे आमदार कालरुस आल्मेदा यांना गेल्या दीड महिन्यापूर्वी अर्धागवायूचा झटका आला. त्यांना उपचारांसाठी मग केरळमध्येही न्यावे लागले. आता त्यांची प्रकृती सुधारतेय. काँग्रेसचे काणकोण मतदारसंघाचे आमदार इजिदोर फर्नाडिस यांच्यावर दोनच दिवसांपूर्वी पणजी परिसरातील एका खासगी इस्पितळात मूत्रपिंडविषयक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या चार आणि भाजपाच्या तीन आमदारांना मधुमेह आहे. मगोपच्या एका आमदाराला मधुमेह असून त्यास डोळ्य़ांच्या काळजीसाठी उपचार घ्यावे लागतात. गोवा फॉरवर्डच्या एका मंत्र्यास मधुमेहाचा पूर्वीपासून त्रास आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रवी नाईक हे आरोग्याच्या नियमितपणे तपासण्या करून घेत आहेत. मध्यंतरी दिल्ली भेटीवर असताना त्यांना त्रास झाला व अचानक गुरगावच्या इस्पितळात दाखल व्हावे लागले होते. ते गृहमंत्री असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. दिलीप परुळेकर हेही सरकारमध्ये पर्यटन मंत्री असताना 2014 साली त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. सरकारमधील व विरोधकांमधीलही काही आमदारांना नियमितपणे इन्सुलिन घ्यावे लागते. काँग्रेसचे सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस यांना उच्च रक्तदाबाचा त्रस आहे.
राजकारणात असताना कायम दबाव असतो. व्यायाय होत नाही. स्टेसमुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवतात असे काही आमदारांनी लोकमतला सांगितले. स्वर्गीय माथानी साल्ढाणा हे यापूर्वीच्या काळात पर्यटन मंत्रीपदी असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व लगेच त्यांचा मृत्यू झाल्याची आठवण गोव्यात अजुनही ताजीच आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे निवडणुकीत गेल्यावर्षी पराभूत झाल्यानंतर घरीच असतात. ते विश्रांती घेतात व यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण आता पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले, की आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी सर्वच मंत्री, आमदारांनी चांगली जीवनशैली ठेवावी लागेल. मी स्वत:ही माझा डाएट बदलला आहे. वजन वाढल्यामुळे मी आहार बदलला. अधिकाधिक शाकाहाराचाच मी स्वीकार करत आहे. शेवटी कितीही चांगली जीवनशैली ठेवली तरी काही ना काही समस्या प्रत्येक माणसाबाबत उद्भवत असते. त्याला उपाय नाही पण चांगली जीवनशैली ठेवावीच लागेल.