पणजी : गोव्यातील किना-यांवर ठिकठिकाणी असलेल्या शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार अलीकडे वाढल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. सोमवारी मध्यरात्री समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने बागा, कळंगुटसह काही किना-यांवरील शॅकांमध्ये पाणी घुसून हानी झाली.
अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ बागा किना-यावरच तब्बल २0 शॅकांमध्ये पाणी घुसले. कळंगुटसह अन्य किना-यांवरही शॅकमध्ये पाणी शिरले. ते म्हणाले की, ‘गेल्या १८ आॅक्टोबर रोजी वादळामुळे पाण्याची पातळी वाढून असेच पाणी शॅकांमध्ये शिरले आणि हानी झाली. गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी ‘ओखी’ वादळात पाण्याची पातळी वाढली आणि पाणी शॅकांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला.
नैसर्गिक आपत्ती असल्याने अनेकांनी सरकार दरबारी नुकसान भरपाईसाठी दावे केले परंतु त्यांना भरपाई मिळू शकली नाही. पर्यटन खाते शुल्काच्या स्वरुपात भरमसाट पैसे घेते. ६५ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. परंतु अशाआपत्तीच्यावेळी काहीच भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाईसाठी सरकारचे निकष तरी काय, हे स्पष्ट व्हायला हवे.
पर्यटक संख्या घटली : कार्दोझदर वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात पर्यटकांची संख्या कमी आहे, याचे कारण मलेशिया, श्रीलंका, सिंगापूरमध्ये स्वस्तात पर्यटन उपलब्ध झाले आहे. गोव्यात तुलनेत महागाई आहे त्यामुळे पर्यटक पाठ फिरवतात. दुसरी बाब म्हणजे पर्यटकांच्या बाबतीत गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात वाढलेले आहे. अलीकडेच काणकोण येथे विदेशी महिलेवर बलात्कार झाला. अशा अन्य घटनाही गेल्या काही काळात घडलेल्या आहेत त्यामुळे वाईट प्रतिमा निर्माण झालेली आहे, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले.
‘हा परिणाम त्सुनामीचा नसावा’ राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे ज्येष्ठ शास्रज्ञ बबन इंगोले यांच्या मतें इंडोनेशियातील त्सुनामीचा हा परिणाम नसावा कारण त्सुनामीला दोन दिवस उलटून गेले आहेत. पूर्व किनारपट्टीवर वादळी वा-यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. पौर्णिमेचे दिवस असल्याने समुद्राला भरती आहे. अशा वेळी कुठेतरी वादळाचा तडाखा बसल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कुठेतरी पर्जन्यवृष्टीही होत असते. अलीकडच्या काळात पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार वाढलेले आहेत.