पणजी : आयआयटीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांनी सरकारकडे काडीमोड घेत पाठिंबा काढून घेतला आहे. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केले. जमीन व्यवहारांबाबत मुख्यमंत्र्यांनी जे आरोप आहेत त्याची खुशाल चौकशी करा, असे आव्हानही आमदार गावकर यांनी दिले आहे.
पत्रकार परिषदेत गांवकर म्हणाले की, 'आयटी प्रकल्पासाठी सांगे मतदारसंघात कोटार्ली, रिवण आणि उगें अशा तीन जमिनी मी दाखवल्या. यापैकी दोन भूखंड हे सरकारी मालकीचे होते. सरकारी जमिनीतून कमिशन खायला मिळते हे मुख्यमंत्र्यांच्या तोंडून प्रथमच मी ऐकले. उगें येथील जागा ही सोशियादाद सोसायटीची आहे. सोसायटीचा ही एक रुपया देखील खायला मिळतो तर दाखवावे. मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केले आहेत त्या सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. मी काहीही गैर केले नाही आणि जमिनींचे कोणतेही व्यवहार केलेले नाहीत. हवे तर मुख्यमंत्र्यांनी पाईक देवस्थानात येऊन नारळाला हात लावून प्रमाण व्हावे.''पर्रीकरांनी शब्द दिला होता'आमदार गावकर म्हणाले की, ' माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयात असताना माझ्या पहिल्या वाढदिनी सांगे आले तेव्हा आयआयटी सांगेत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यासाठी प्रक्रियाही सुरू झाली होती. परंतु नंतर आलेल्या सावंत सरकारने या बाबतीत सहकार्य दिले नाही. आयआयटी सत्तरीला हलविण्याचा निर्णय या सरकारने घेतला तेव्हा १६ सप्टेंबर २०१९ रोजी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आक्षेप घेतला.
दरम्यान, ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे २७ आमदार असून अपक्ष आमदार गोविंद गावडे हे सरकारात आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला पाठिंबा असतो.