पणजी : लॉकडाऊनमुळे आधीच झुवारी पुलाचे काम मंदावले त्यात आता भारत-चीन तणावाचाही बांधकामावर परिणाम झालेला आहे. दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलासाठी सल्लागार म्हणून चीनची कंपनी काम पहात आहे. या कंपनीला आता उभय देशांमधील तणावामुळे वगळले जाण्याची शक्यता आहे. चीनमधून पुलासाठी आयात केले जाणारे साहित्यही बंद करुन अन्य पर्याय शोधले जातील.
सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी ही माहिती दिली. १४00 कोटी रुपये खर्चुन झुवारी नदीवर आठ पदरी समांतर पुलाचे बांधकाम चालू आहे. केंद्र सरकारने चीनवर अधिकृतपणे बंदी घातल्यास ही पावले उचलावी लागतील.
पुलाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून बांधकाम पाहण्यासाठी चीनच्या या कन्सल्टंटचे पथक येणार होते. ३५ टक्के जे काम राहिले आहे त्याला लागणारे साहित्य चीनहून आयात केले जाणार होते.
चीनमधील शांघाय टोंगांग ब्रिज टेक्नॉलॉजी ही कन्सल्टंसी झुवारी पुलासाठी सल्लागरा म्हणून सेवा देत आहे. तर मध्यप्रदेशची दिलीप बिल्डकॉन कंपनी पुलाचे बांधकाम करीत आहे. या पुलास माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जाणार आहे.
चीनचा कन्सल्टंट तसेच साहित्य याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे पाऊसकर म्हणाले.
हा पूल वास्तविक डिसेंबर २0१९मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु कोविड संकटामुळे रखडला.