मडगाव : चीन सीमेवर लढताना भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागते. देशाच्या सीमेचे व आपल्या सैनिकांचे रक्षण करणे भाजपला जमत नाही, परंतु मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपुर्ती करुन उत्सव साजरे करण्याची भाजपची कृती निषेधार्ह आहे. लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना गोव्यात नेटवर्क मिळत नसताना, भाजपच्या रॅलीला नेटवर्क कसा मिळतो व कोण देतो हे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी काॅंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गुरुवारी लोहिया मैदानावर बोलताना केली.
गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती तर्फे आज ७५वा क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, दक्षिण गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस, विठू मोरजकर, दीपक खरंगटे, फिडोल पेरेरा, लाॅयोला फर्नांडिस, नगरसेवक अविनाश शिरोडकर, पराग रायकर व इतर हजर होते.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारची चुकीच्या धोरणांमुळे आज गोव्याच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यातच कोरोना लाॅकडाऊनमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असुन, सरकारकडुन आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. भाजप सरकारने केवळ घोषणा व रॅली आयोजित करुन उत्सव साजरे न करता लोकांना रोख मदत देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
सरकारने आता गोव्यातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरुन त्याचा फायदा लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना ॲानलाईन शिक्षणासाठी मिळेल. भाजपने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपुर्ती निमीत्त केद्रिय मंत्री नितीन गडकरींची व्हर्चुअल रॅली आयोजित करून उत्सव साजरा करण्याच्या भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या घोषणेचा चोडणकर यांनी निषेध केला आहे व सदर रॅली रद्द करुन, त्या रॅलीवर येणार लाखो रुपयांचा खर्च गरजवंताना द्यावा अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्षानी केली आहे.
या संकटकाळात शेतकरी व बागायतदारांना त्वरीत मदत करण्याची गरज आहे. लोकांना दिलासा मिळेल अशी योजना व काम सरकारने हाती घेणे गरजेचे असताना भाजप रॅली करण्यात लाखो रुपये खर्च करीत आहे. सरकारने जबाबदारीने वागणे व लोकांना आत्मविश्वास देणे गरजेचे असुन, मोटार सायकल पायलट, टॅक्सीवाले, गाडा व्यापारी व सामान्य माणसांना आज सर्वाधीक झळ बसल्याचे त्यानी सांगीतले.
मुख्यमंत्री मोबाईल टाॅवरचे कारण सांगुन लोकांना दोष देतात ते चुकीचे असुन, मागील ८ वर्षात भाजपने केलेल्या गैरकारभारामुळे व चुकीच्या धोरणामुळेच आज ही परिस्थीती निर्माण झाली आहे हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे. सरकारी कर्मचाऱ्यांची गृह कर्ज योजना बंद करुन खर्च कपातीचे कारण देणाऱ्या मुख्यमंत्र्यानी आपली मंत्रीमंडळ संख्या कमी करुन योग्य पायंडा घालावा अशी मागणी चोडणकर यांनी केली.