'भारताकडून इंग्लंडला 34 रुपयांनी पेट्रोल निर्यात, मग भारतात महाग का ?'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 12:48 PM2018-09-06T12:48:37+5:302018-09-06T12:51:05+5:30
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत.
पणजी : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत. इंधन दरवाढीच्या प्रश्नावर प्रदेश काँग्रेसने आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. यावेळी आमदारही रस्त्यावर उतरतील, असा इशारा आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे. तसेच भारताकडून इंग्लंडला 34 रुपये लिटर दराने पेट्रोल दिले जाते, असेही सोपटे यांनी सांगितले.
आमदार सोपटले म्हणाले की, ‘गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने 12 वेळा कर वाढवला. मे 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा 211 टक्के कर होता, तो आज 446.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. गोव्यात 2014 साली पेट्रोलचा दर 61 रुपये आणि डिझेलचा दर 58 रुपये प्रति लिटर होता. आज हेच दर अनुक्रमे 73.22 रुपये आणि 72.74 रुपयांवर पोहोचले आहेत. सर्वसामान्य जनतेचे या महागाईत कंबरडेच मोडलेले आहे.
देशात वाहनधारकांना एवढे महाग इंधन खरेदी करावे लागत असताना भारतातून इंग्लंड किंवा अन्य राष्ट्रांना निर्यात केले जाणारे पेट्रोल 34 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 37 रुपये प्रति लिटर या दराने निर्यात केले जाते. यातून तब्बल 11 लाख कोटी रुपये महसूल देशाला मिळतो हे खरे असले तरी अन्य राष्ट्रांना कमी दराने निर्यात करण्यापेक्षा देशातील वाहनधारकांना ते स्वस्तात उपलब्ध करणे संयुक्तिक ठरेल, असे सोपटे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, चांगल्या गोष्टीचे श्रेय आपल्याकडे घेणे आणि वाईट गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे अशी भाजपची नीती बनली आहे. 2014 साली स्वयंपाकाचा गॅस 414 रुपये होता. आज तो 807 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढलेला नाही. पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुली काढून एलपीजी गॅस घेण्यास लोकांना भाग पाडले. आता गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून सर्वसामान्यांना जीणे मुश्किल बनले आहे. डिझेल महाग झाल्याने ट्रॉलरमालकांना ट्रॉलर बंद ठेवावे लागत आहेत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीही इंधन आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या प्रश्नावर आंदोलन छेडले होते.