पणजी: भारत हा कथाकथन करणारा देश आहे आणि लोकही तल्लीन होवून कथा ऐकत असतात, ह्याच परंपरागत कौशल्यामुळे आणि आणि याच सर्जनशीललतेमुळे देशात चित्रपट उद्योग यशस्वी होत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
इफ्फीत व्हिज्युअल इफेक्टस- दृष्यात्मक प्रभाव (व्हीएफएक्स’)टाकणारे तंत्रज्ञान आणि ‘ टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन केल्यानंर या कार्यक्रमात मंत्री म्हणाले की देशातील प्रसार माध्यमांची आणि मनोरंजन अर्थव्यवस्था अभूतपूर्व आहे. या क्षेत्रामध्ये १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचण्याइतकी वृध्दी भारताने केली आहे. देशातील चित्रपट आणि माध्यम सामग्रीमध्ये असलेली प्रतिभा आणि परिमाण पाहता, भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग बनेल असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला.
मंत्री म्हणाले की, भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि नवकल्पनांचाही स्वीकार केला जात आहे. याच बरोबरच आमच्या तरुण मुलांची प्रतिभा आणि आमच्या उद्योगातील प्रमुख मंडळींनी आणलेल्या नाविन्यामुळे भारत हे एक चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रनिर्मिती पश्चात कार्यासाठी सर्वाधिक मागणी असलेले स्थान बनले आहे.
इफ्फीतील फिल्मबाजारात व्हीएफएक्स टेक पेव्हेलियन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. मंत्र्यांनी सोनीच्या फुल फ्रेम सिनेमा लाइन कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक घेतले आणि ‘ ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रमांतर्गत निवडलेल्या तरुण चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. टेक पॅव्हेलियनच्या ‘ बुक टू बॉक्स’ विभागातील निवडक लेखकांशीही त्यांनी संवाद साधला.