लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: काँग्रेसने चुकीची धोरणे लावल्याने एकेकाळी भारताची - आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. आज भारत आर्थिक बाबतीत झपाट्याने प्रगती करत असून, फक्त नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाचव्या क्रमांकाच्या आर्थिक स्थितीवर आणले आहे. आगामी तीन वर्षांत भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून त्यासाठी नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. राजीव चंद्रशेखर यांनी केले.
फोंडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, एन.आर.आय. आयुक्त नरेंद्र सावईकर, मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले, 'एक काळ असा होता की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही खूप मागे होतो. प्रत्येक बाबतीत आम्हाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागायचे. साध्या स्मार्टफोन बाबतीत आम्ही ८२ टक्के आयात करत होतो. आज आम्ही शंभर टक्के उत्पादन येथे घेत आहोत. तर दुसऱ्या देशाला आम्ही मोबाईल पुरवत आहोत. हा फरक नरेंद्र मोदींनी घडवून आणला.
२०१४ मध्ये भाजपने ज्यावेळी सरकार स्थापन केले, त्यावेळी एक कमकुवत देश काँग्रेसने भाजपकडे सोपवला होता. भारत कधी विकासाभिमुख देश होईल हे त्यावेळेस कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हते; परंतु नरेंद्र मोदी यांनी ते साध्य करून दाखवले आहे, असेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी म्हणाले की, ज्या दिवसापासून केंद्रात भाजपचे सरकार आले त्या दिवसापासून गोव्याला निधीची कमतरता कधी भासलीच नाही. म्हणून आज एक वेगळा आधुनिक गोवा लोकांना दिसत आहे. जागतिक दर्जाचे विमानतळ आम्ही लोकांना दिले आहे. त्यावेळी दाबोळी बंद होईल, असा काही लोकांनी गैरसमज करून घेतला होता; परंतु आज दोन्ही विमानतळावर तेवढ्याच संख्येने प्रवासी येत आहेत. नरेंद्र सावईकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. तर जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.