लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : प्रत्येक घरात समृद्धी, उत्कर्ष, प्रत्येक हाताला काम, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. प्रत्येक घरात समृद्धीसाठी विशेष योगदान दिले. तसेच जागतिक पातळीवर भारताला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. केंद्र व राज्यातील योजनांमुळे प्रत्येक घरात समृद्धी आल्याचे प्रतिपादन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
डिचोली मतदारसंघ भाजपतर्फे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन लाटंबार्से पंचायत सभागृहात केले होते. व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, भाजप नेते दामू नाईक, माजी सभापती राजेश पाटणेकर, कुंदन फळारी, सरपंच पद्माकर मळीक, त्रिशा राणे, प्रदीप रेवोडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवून देशाचा आणखी कायापालट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी केले. मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ, अनेक पूल व इतर सुविधा बहाल करून राज्यात मोठी क्रांती साधली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कर्तबगार नेते असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विकासाला मतदारसंघात मोठी चालना मिळत आहे. कौशल्य विकासित करून प्रत्येक हाताला काम, ही सरकारची संकल्पना असून अनेक योजना घरोघरी पोहोचल्याने प्रत्येक घरात समृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.