मडगाव - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी 'सागर' या योजनेखाली भारतीय तट रक्षक दलाची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच त्यांच्या ताफ्यात 60 टेहळणी जहाजे देण्याबरोबरच 80 विमानांची भर घातली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजय कुमार यांनी उतोर्डा येथे सुरू झालेल्या 'सरेक्स' या तीन दिवसांच्या शोध आणि बचाव प्रात्यक्षिक कार्य परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, लवकरच तट रक्षक दलाच्या ताफ्यात 14 मल्टी रोल व 16 अडवान्स लाईफ हेलिकॉप्टरची भर घातली जाणार आहे.
तीन दिवसांच्या या परिषदेत यंदा प्रथमच हवाई दल यंत्रेणेशी संभंधित घटकांनाही सामाहून घेण्यात आले असून भारतासह एकूण 19 मित्र देशांचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले आहेत. भारतीय महासागराच्या कार्यकक्षेत येणार्या विविध बचाव कार्यासंदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहेत. 2025 पर्यंत भारतीय तटरक्षक दलांच्या बोटींची संख्या 200 वर पोहोचणार असे त्यांनी सांगितले. भारतीय सागरी क्षेत्रात बचाव कार्याची व्याप्ती वाढावी यासाठी देशात तट रक्षक दलाची नवीन 29 उपकेंद्रे स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही कुमार यांनी दिली.
देशातील पहिली तट रक्षक दल अकादमी मंगळुरू येथे स्थापण्यात येत असून 160 एकर जमिनीत उभ्या राहणार्या या अकादमीसाठी लवकरच जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. या अकादमीत बचाव कार्याच्या शिक्षणाबरोबरच आंतरराष्ट्रीय सागरी कायदे व पर्यावरणीय उपाययोजना याचेही शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्ग हा एकमेव महत्वाचा मार्ग असल्याने तसेच भारतीय महासागरावरून होणार्या वाढत्या हवाई उड्डाणामुळे आशिया खंडातील वाहतुकीची गर्दी वाढली असून त्यामुळे आता सागरी बचाव कार्यात विमानांचे महत्त्वही वाढले असून सागरी अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी या सागरी कक्षेतील सर्व मित्र देशांनी एकत्र येऊन काय उपाय घेता येईल या संदर्भातही या परिषदेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी चर्चा या ती दिवसात होणार असल्याचे त्यांनी संगितले. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन, जहाजोद्योग मंत्रालयाचे महासंचालक अमिताभ कुमार, अलायन्स एयरचे सी. एस. सुबय्या तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.