मडगाव - गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले. सदर अधिकारी मूळ अंबाला-हरियाणा येथील असून पुण्यात त्याचे पोस्टींग करण्यात आले होते. पुण्यातून तो गोव्यात आला असता गुरुवारी दुपारी ही दुर्घटना काब द राम येथे घडली.गोवा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशु नौटीयाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या दुर्घटनेत हा अधिकारी काहीसा जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने वास्कोतील नौदलाच्या जीवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तटरक्षक दलाच्या या धाडसी मोहिमेत लेफ्ट. कर्नल ऋषी शर्मा (पायलट) व डेप्यूटी कमाडंट विश्व जीत सिंग यांनी मोलाची कामगिरी बजावली. हेलिकॉप्टरमधून पाण्यात दोर सोडून या अधिका:याला वर काढण्यात आले.
खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 7:40 PM