विलास ओहाळ
पणजी : राज्यात वार्षिक सरासरी 50 ते 60 लाख पर्यटक गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटकांना येथील समुद्र किनारे सुरक्षित वाटत असले तरी, देशी पर्यटकांना असुरक्षित वाटतात. ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ रिसर्च अँड अॅनेलिटिकल रिव्हिवज’ (आयजेआरएआर) या संस्थेच्या ताज्या अहवालात हा निष्कर्ष काढला आहे.
डॉ. यास्मिन शेख यांनी ‘गोव्यातील पर्यटन-पर्यटकांचा दृष्टिकोन’ या मथळ्याखाली ‘आयजेआरएआर’ला प्रबंध सादर केला आहे. त्यांनी 400 देशी-विदेशी पर्यटकांची मनोगते जाणून घेतली आणि निरीक्षणे नोंदविली आहेत. प्रबंधात त्यांनी म्हटले आहे की, जवळपास 50 लाख विदेशी पर्यटक दरवर्षी गोव्यात येतात. ते किनारे असुरक्षित आहेत, असा कधी प्रसार करीत नाहीत. मात्र देशी पर्यटकांकडून किनारे असुरक्षित असल्याचा गवगवा केला जातो.
राज्यातील किनाऱ्यावर बहुतांश पर्यटकांना दिवसा सुरक्षितत वाटते, रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटते. किमान 62.19 टक्के देशी पर्यटकांना किनारे असुरक्षित वाटतात. उलट परदेशी पर्यटकांना रात्रीचे किनारे सुरक्षित वाटतात. डॉ. शेख यांच्या प्रबंधात इंग्लंडच्या 15 वर्षीय स्कार्लेट किलिंगच्या 2008 मधील हणजुणे किनाऱ्यावर झालेल्या मृत्यू प्रकरणावर प्रकाशझोत आहे. स्कार्लेटच्या मृत्यूनंतर विदेशी माध्यमांनी हा विषय चांगलाच चर्चिला होता. त्यावेळी गोव्यातील किनाऱ्यावर परदेशी पर्यटकांना सुरक्षित ठिकाण आहे का, अशी विचारणा माध्यमांतून केली जात असे. गोव्यात 21 वर्षात 245 परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने राज्य सरकारला याविषयी विशेष विभागाची निर्मिती करण्याची सूचना केली होती, याचाही उल्लेख या प्रबंधात आहे.
प्रबंधातील निवडक मुद्यांवर एक नजर..
1) पर्यटनासाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही पर्यटकांनी वैद्यकीय सुविधा, पोलीस यंत्रणा यांच्याविषयीसुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.
2) किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी गुन्हे घडू नयेत याकरिता रात्रीचा फिरता पहारा ठेवणे महत्त्वाचे आहे. पर्यटक सुरक्षित असतील तरच पर्यावरणही सुरक्षित राहील.
3) ट्रॅव्हल अँड टुरिझमने सुरक्षिततेवर भर द्यावा आणि त्यांना ही चांगली संधीही आहे. महिलांना किनाऱ्यावर रात्रीच्यावेळी सुरक्षित वाटावे, यासाठी महिला पोलीस दलाची किनाऱ्यावर नियुक्ती करावी, तरच महिला पर्यटकांना सुरक्षित वाटेल आणिकिनाऱ्यावर गुन्ह्याच्या घडणाऱ्या घटनांनाही आळा बसेल.