पणजी : पाच विकसित देशांना एकत्र आणून परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. गोव्यात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान फुटबॉलमधील पाच दिग्गज देशांची १७ वर्षांखालील गटातील स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत भारताला ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, रशिया या दिग्गज संघांचे आव्हान राहणार आहे. ही स्पर्धा आगामी विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गोयल यांच्या हस्ते ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, एआयएफएफचे महासचिव कुशल दास, ब्रिक्सचे सीईओ राजीव बल्ला, माजी कर्णधार बायचुंग भुतिया आदी मान्यवर उपस्थित होते. बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडियमच्या इनडोअर सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी विजय गोयल म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने या स्पर्धेसाठी आग्रह धरला होता. फुटबॉलचा विकास व्हावा, आंतरराष्ट्रीयस्तरावर भारतीय खेळाडूंना अधिकाधिक खेळण्याची संधी मिळावी, आगामी विश्वचषकाची चांगली तयारीव्हावी, या उद्देशाने गोव्यात प्रथमच १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. ही स्पर्धा ५ ते १२ आॅक्टोबरदरम्यान होईल. स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. ब्रिक्स स्पर्धा समितीकडे या स्पर्धेचे आयोजन सोपविण्यात आले आहे. स्पर्धा ५ आॅक्टोबरपासून सुरू होईल. १५ आॅक्टोबर रोजी अंतिम सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात येईल. (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धेचे वेळापत्रक असे :प्राथमिक पात्रता फेरी : सर्व सामने बांबोळी मैदानावर - ५ आॅक्टोबर २०१६ चीन वि. ब्राझील सायं. ४ वा., रशिया वि. भारत रात्री ८ वा. ७ आॅक्टो - दक्षिण आफ्रिका वि. भारत सायं. ४ वा., चीन वि. रशिया रात्री ८ वा.९ आॅक्टो - ब्राझील वि. रशिया सायं. ४ वा. दक्षिण आफ्रिका वि. चीन रात्री ८ वा.११ आॅक्टो - भारत वि. चीन सायं. ४ वा. ब्राझील वि. दक्षिण आफ्रिका रात्री ८ वा.१३ आॅक्टो - रशिया वि. दक्षिण आफ्रिका सायं. ४ वा. भारत वि. ब्राझील रात्री ८ वा.
भारतापुढे दिग्गज संघांचे आव्हान
By admin | Published: September 27, 2016 5:00 AM