पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये आपत्कालीन विभाग स्थापन केला जाणार आहे. तिथे या विभागासोबत एक रुग्णवाहिका कायम ठेवली जाईल. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्याकडे अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उद्योग खाते सोपवले आहे. त्यांनी नुकताच स्थितीचा आढावा घेतला व औद्योगिक वसाहतींमध्ये आपत्कालीन विभाग सुरू करावा अशा निर्णयाप्रत ते आले आहेत.
कामगारांना किंवा अन्य मनुष्यबळाला जर तातडीने उपचारांची गरज लागली तर आपत्कालीन विभागाने मदत करावी व रुग्णवाहिकाही गरजेची वाटल्यास ती तात्काळ उपलब्ध व्हावी या हेतूने हे पाऊल उचलले जाईल, असे मंत्री राणो यांनी मंगळवारी येथे सांगितले. औद्योगिक वसाहतींमध्ये अगोदरच उद्योजकांना जे भूखंड देण्यात आले आहेत, त्यांच्या लिजांचे नूतनीकरण करण्यासाठी उद्योजकांनी गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या पणजीतील कार्यालयात येण्याची गरज पडू नये असे मला वाटते. मी महामंडळाशी त्याविषयी चर्चा करीन. लिज नूतनीकरण हे औद्योगिक वसाहतींमध्येच व्हायला हवे. त्यासाठी वसाहतींमध्ये महामंडळाचे छोटे कार्यालय सुरू करता येईल. किंवा तिथूनच ऑनलाईन पद्धतीने लिज नूतनीकरण करता येईल, असेही मंत्री राणो म्हणाले. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात ज्याप्रमाणो आम्ही सोडेक्सोची दज्रेदार अन्न पुरवठा सेवा सुरू केली, तशीच सेवा औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांसाठी सुरू करता येईल काय हेही पडताळून पाहिले जाईल. औद्योगिक वसाहतींमध्ये त्यासाठी योग्य उपहारगृहाची किंवा स्वयंपाक खोलीची सोय केली जाईल, असे मंत्री राणो म्हणाले.
मंत्री राणो हे नुकतेच दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटून आले आहेत. केंद्र सरकार व गोव्याचे उद्योग खाते यांच्यात मोठा समन्वय असेल. केंद्राच्या योजना गोव्याच्या उद्योग क्षेत्रत राबविल्या जातील. गोयल तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच स्मृती इराणी या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामे पुढे नेऊ. मुख्यमंत्री सावंत यांचे त्यासाठी मला पूर्ण सहकार्य लाभत आहे, असेही मंत्री राणो म्हणाले.