मडगाव : मागची कित्येक वर्षे बिनबोभाटपणे दक्षिण गोव्यात ड्रग्सचा व्यवहार करणारा कुख्यात आरोपी व्हेली डिकॉस्ता याला गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अंमलीपदार्थ प्रतिबंधक (एएनसी) पोलीस विभागाने सापळा रचून कुठ्ठाळी येथे अटक केली. या विभागाचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी आरोपीकडे चरस व गांजा असा एकूण 4.85 लाखांचा माल सापडला.व्हेली डिकॉस्ता हा तिळामळ-केपे येथे राहात होता. आपल्या घरातूनच तो ड्रग्सचा व्यवसाय चालवित असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मागचे दोन महिने एएनसीचे पोलीस त्याच्या मागावर होते. बुधवारी रात्री व्हेली कुठ्ठाळी येथे डिल करणार अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ठेवला. मध्यरात्री आपल्या महिंद्रा एसयूव्ही या गाडीने कुठ्ठाळी फेरी धक्क्यावर संशयित आला असता पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दीड किलो चरस आणि 1.180 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. अधीक्षक गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संशयित ड्रग्सच्या व्यवसायात आहे, याची पोलिसांना कुणकुण होती. अशातच त्याने एक महिन्यापूर्वीच नवीन गाडी घेतल्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता. त्यामुळेच पोलिसांनी सापळा रचून एक बनावट ग्राहकातर्फे व्हेलीकडे डिल केले, त्यातच व्हेली अडकला.व्हेली अडकल्याने आता केपे, कुडचडे परिसरात काहीजणांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केल्यास कित्येकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्हेली आपल्या गँगच्याद्वारे हा व्यवसाय चालवत होता आणि ड्रग्सच्या त्याच्या या विळख्यात केपे, कुडचडे परिसरातील कित्येक युवक आणि विद्यार्थी आले होते. यापूर्वी याच व्हेलीला पोलिसांनी 2010 साली आपल्याच आत्याच्या घरी दरोडा घालण्याच्या प्रकरणात अटक केली होती. त्याशिवाय त्याला रस्त्यावरील वाटमारी प्रकरणातही अटक करण्यात आली होती. कुख्यात दरोडेखोर मायकल फर्नाडिस याच्याशीही व्हेलीचा संबंध होता.
कुख्यात ड्रग्ज डिलर व्हेली डिकॉस्ताला कुठ्ठाळीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 7:41 PM