वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या गांधीनगर, वास्को येथील कचरा टाकण्यात येणाऱ्या ठीकाणी असलेल्या एका कचरा पेटीतून पोलीसांनी शुक्रवारी (दि.२८) दुपारी काही महीन्यापूर्वीच जन्मलेल्या अज्ञात बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. कचरा पेटीतून ताब्यात घेतलेल्या त्या बालकाचा मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असून त्याला या कचरा पेटीत एक या दोन दिवसापूर्वी टाकण्यात आल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. कचरा टाकण्यात येणाऱ्या ठीकाणी ठेवलेल्या कचरा पेटीत त्या मृत बालकाला टाकण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आल्यानंतर या प्रकाराबाबत येथे राहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त करून हे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास सदर प्रकार उघडकीस आला. वास्को पोलीस स्थानकावरील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार याभागात राहणारा एक नागरिक येथून जात असताना त्यांने येथे असलेल्या कचऱ्याच्या परिसरात उलटी पडलेल्या कचरा पेटीत एक बालक असल्याचे पाहीले. त्यांने त्वरित याभागात राहणाऱ्या काही नागरिकांना तसेच नंतर वास्को पोलीसांना या घटनेची माहीती दिली. पोलीसांना या घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित येथे धाव घेऊन कचरा पेटीतून बालकाला बाहेर काढला असता त्याचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या बालकाचा मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशीयस यांच्याशी चर्चा केली असता प्राप्त झाली.
पोलीसांनी मृतदेहाचा तसेच घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह मडगाव येथील इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला असून शवचिकित्सेनंतरच त्या बालकाच्या मृत्यूमागे घातपात आहे की मृत्यूचे कारण अन्य काय आहे हे स्पष्ट होणार असल्याची माहीती पोलीसांनी दिली. मृतअवस्थेत आढळलेला हा बालक (मुलगा) सुमारे ४ ते ५ महीन्याचा असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून शवचिकित्सेनंतरच त्याचे वय काय आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा बालक कोणाचा आहे याबाबतही शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीसांना कुठलीच माहीती प्राप्त झाली नसून त्याच्या आई वडीलांचा शोध पोलीस करित आहेत.
दरम्यान गांधीनगर भागात कचरा टाकण्यात येत असलेल्या परिसरातील कचरा पेटीत एका बालकाचा मृतदेह असल्याची माहीती येथे राहणाऱ्या लोकात पसरताच त्यांनी येथे गर्दी करण्यास सुरू करून अशा प्रकारे बालकाला कचरा पेटीत फेकल्याने याबाबत संताप व्यक्त केला. याभागाचे नगरसेवक धनपाल स्वामी यांना या घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन येथे घडलेल्या घटनेची माहीती जाणून घेतली. अशा प्रकारे निष्पाप बालकाला कचरा पेटीत फेकण्यात आल्याचा हा प्रकार एकदम दु:खजनक असून खरोखरच ही एक वाईट घटना असल्याचे ते म्हणाले. या बालकाची हत्या करून त्याला येथे फेकण्यात आलेला आहे की या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला येथे फेकला गेला याचा तपास होणे गरजेचे आहे.
कदाचित या बालकाची आई - वडील गरीब असावेत व त्या बालकाच्या निधनानंतर त्यांनी त्याला येथे टाकला असावा असा संशय नगरसेवक धनपाल स्वामी यांनी व्यक्त करून काहीही होऊ द्या करण्यात आलेले हे कृत्य एकदम वाईट असल्याचे ते म्हणाले. या अज्ञात बालकाला याभागातीलच कोणी नागरिकाने येथे आणून फेकला की बाहेरून कोणी येऊन त्याला येथील कचरा पेटीत फेकला याबाबत पोलीस चौकशी करत असून अज्ञात बालकाच्या आई - वडीलाचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व मार्गाने काम करत असल्याची माहीती सूत्रांनी दिली. येथे नागरिकांकडून कचरा फेकण्यात येत असल्याने त्या बालकाला कचऱ्याच्या पेटीत फेकल्यानंतर त्याच्या मृतदेहाबाबत कोणालाही माहीती मिळणार नाही असाच विचार करून तर अज्ञात व्यक्तीने बालकाला येथील कचरा पेटीत फेकला का असा प्रश्न सुद्धा अनेकात उपस्थित झालेला असून हे कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर गजाआड करून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सदर परिसरात राहणाºया लोकांकडून केली जात आहे. पोलीसांनी त्या बालकाचा मृतदेह शवगृहात पाठवलेला असून या प्रकरणात वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.