म्हापसा : गेल्या महिन्यात गणेशपुरी म्हापसा येथे पहाटेच्या दरम्यान निर्जस्थळी दोन युवकांवर पुर्ववैमनस्यातून लोखंडी सळीचा वापर करून झालेल्या खूनी हल्ला प्रकरणातील जखमी झालेल्या अहमद देवडी ( ३० म्हापसा) याचा उपचारादरम्यान आज मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्यावर गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु होते.
या हल्ल्यात संदेश साळकर हा दुसरा युवक जखमी झालेला. ३० मे रोजी हा हल्ला झालेला. म्हापसा पोलिसांकडून या प्रकरणात आरंभी तिघांना तर आठवडा भरानंतर तिघांना मिळून आतापर्यंत ६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच प्रमुख संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आरके अद्यापही फरार आहे. आरकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती, पण तेथे तो पोलिसांना सापडू शकला नव्हता. त्याचा शोध घेण्याचे कार्य अद्यापही सुरुच असल्याची माहिती निरीक्षक निखील पालयेकर यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या संशयितात शरणबाबू गायडकवाड (लक्ष्मीनगर), नागराज पुजारी (पेडे) तसेच बोरेश पुजारी (शेल्डे) यांचा समावेश आहे. या प्रकरणात यापूर्वी श्रीधर किल्लेदार, अभिशेक पुजारी तसेच मंथन च्यारी यांना अटक करण्यात आली होती.