नारायण गावस -
पणजी: हणजूण तसेच म्हापसा व इतर ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे वीज केबल्स घातल्याने नागरिकांना शॉक लागण्याच्या तक्रारी वाढत आहेत. वीज मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याची दक्षता खात्यामार्फत चाैकशी करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्या सोबत आपचे नेते सलमान खान व इतर उपस्थित हाेते.
वाल्मिकी नाईक म्हणाले राज्यात सध्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या घातल्या जात आहेत. जवळपास ५ हजार काेटींचे हे काम आहे. पण यासाठी काही कंत्राटदारांना कंत्राट दिली जात आहे. पण म्हापसा हणजूण तसेच इतर काही ठिकाणी कमी दर्जांचे केबल घालण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो. हा एक मोठा घोटाळाच आहे. राजस्थानमधील कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. वीज खात्याचा हा मोठा भ्रष्टाचार असू शकतो त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चौकशी व्हावी तसेच वीज मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देण्यात गरजेचे आहे. जनतेचे पैसे असे नकाे तिथे वाया घालवले जात आहे.
सलमान खान म्हणाले या ठिकाणी कुठलाच योग्य अभ्यास न करता तसेच व्यवस्थित मार्गदर्शन तत्वांचे पालन न करता हे केबल्स घातले आहे. पण त्याचा धोका आहे. यामुळे लाेकांना शॉक येण्याची घटना घडू शकते तसेच केेबल बाहेर येऊ शकतात. त्यामुळे या सर्वप्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.