पणजी : गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट जगभ्रमंती करुन येत्या सोमवारी २१ रोजी गोव्यात परतणार आहे. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन नौदलाच्या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत गेल्या १0 सप्टेंबर रोजी जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत.
भारतीय समुद्र हद्दीत ही बोट आलेली असून गोव्यापासून सुमारे ३२0 सागरी मैल अंतरावर आहे. वारा नसतानाही बोटीने १२ तासात २0 सागरी मैल अंतर पार केल्याचे आढळून आले आहे. सोमवारपर्यंत ही बोट गोव्यात पोचेल, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर घेतल्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकारी २१,६00 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाºयांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
या महिला अधिकाºयांना वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. ७ मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी ६0 किलोमिटर वाºयाच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. आॅस्ट्रेलिया, न्युुझिलॅण्ड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रि केत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट ५५ फूट लांबीची असून गोव्यातच अॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाºयांनी अनुभव घेतला.