पणजी : लाच प्रकरणात अडकलेले पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. फसवणूक प्रकरणात एफआयआर नोंदणीसाठी तक्रारदाराकडून ५ लाख ५0 हजार रुपये घेण्याच्या प्रकरणात गर्ग यांची पोलीस खात्याकडून चौकशी न करता स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वास्को येथील मुन्नालाल हलवाई यांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी फोंडा पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे आढळल्यामुळे हलवाई यांनी महानिरीक्षक गर्ग यांची भेट घेऊन प्रकार त्यांच्या कानावर घातला होता; परंतु या प्रकरणात फोंडा पोलिसांना समज देण्याऐवजी गर्ग यांनी ती तक्रार नोंदवून घेण्यासाठी तक्रारदाराकडे दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचेची रक्कम ५ लाख ५0 हजारांवर आणली होती आणि दोन हप्त्यांत ती स्वीकारलीही होती, असा दावा तक्रारदाराने केला होता. तसेच लाचेचे पैसे स्वीकारल्यानंतर त्याची कबुली देताना गर्ग यांच्या आवाजाचे आॅडिओ रेकॉर्डिंग करून त्यांनी ते तक्रारीसोबत भ्रष्टाचारविरोधी पथकाला पुराव्यादाखल दिले होते. शुक्रवारी विधानसभेत कामकाज सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख करून ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आणि या प्रकरणात चौकशीची घोषणा केली. (प्रतिनिधी)
महानिरीक्षक गर्ग यांची स्वतंत्र चौकशी
By admin | Published: August 13, 2016 1:54 AM