म्हापसा : व्हिसा नियमांचे उल्लंघन करुन मुदत संपूनही बेकायदेशीरपणे गोव्यात वास्तव्य करुन राहणाऱ्या किंवा योग्य प्रकारची कागदपत्रे नसताना वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी म्हापशात तयार करण्यात आलेले नजरबंदी केंद्र सोमवार ६ मे पासून हंगामी तत्वावर कार्यान्वीत करण्यात येणार आहे. म्हापशातील जुन्या उपकारागृहाचे रुपांतर नजर बंदी केंद्रात करण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारचे हे तिसरे केंद्र असणार आहे.
राज्यात निवडणुकीसाठीची लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सदर केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण खात्याचे सचिव डब्लू. आर. मूर्ती यांनी पत्रकारांना दिली. सदर केंद्राची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक प्रणब नंदा, महानिरीक्षक जसपाल सिंग, उपमहानिरीक्षक राजेश कुमार व परमादित्य, पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, खात्याचे संचालक वेनान्सीयो फुर्तादो, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव परिमल राय यांनी या नजरबंद केंद्राची उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यातील सुविधांचा आढावा घेतला. काही सुचना सुद्धा केल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून चर्चा केली. घेतलेल्या बैठकीनंतर खात्याचे सचिव डब्लू. आर. मूर्ती यांनी सदर केंद्र सोमवार पासून हंगामी तत्वावर सुरु केले जाणार असल्याचे सांगितले. त्यात २३ जणांना ठेवण्यासाठीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एकंदरीत १५ पुरुष तसेच ८ महिलांची वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. आकडा वाढल्यास अतिरिक्त सोय करण्याची सुविधा सुद्धा त्यात उपलब्ध असल्याचे मूर्ती म्हणाले. सदरचा आकडा वाढवण्यास पोलिसांकडून योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.
अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर केंद्रात मुदत संपून वास्तव्य करु राहणाºया विदेशी नागरिकांना त्यात ठेवले जाणार आहे. त्यांना ठेवलेल्या ठिकाणी फक्त संबंधीत देशातील राजदूत कार्यालयातील अधिकाºयांना प्रवेश दिला जाणार आहे. संबंधीतांनी योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. या पूर्वी देशात दिल्ली, लक्षव्दीप येथे अशा प्रकारची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दर वर्षी किमान २०० च्या आसपास विदेशाी नागरिकांना ताब्यात घेतले जाते.