पणजी : माध्यम प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावा, अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी अनेक आमदारांनी हा विषय लावून धरला. माध्यम विधेयक चिकित्सा समितीकडे पडून आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून याबाबतीत अनिश्चितता नको. हा विषय आणखी क्लिष्ट होण्याआधीच सरकारने सोक्षमोक्ष लावावा, असा सल्ला कामत यांनी दिला. दरम्यान, इयत्ता अकरावीत प्रवेश देताना काही महाविद्यालयांनी सक्तीच्या कोचिंग क्लासची नवी टूम काढली आहे. ७० हजार रुपये भरून कोचिंग घेण्याची सक्ती केली जात आहे. याची चौकशी करा, अशी मागणी कामत यांनी केली. ‘कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही गुण द्या’ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांप्रमाणेच कला क्षेत्रातही कामगिरी केल्यास गुण दिले जावेत. सांस्कृतिक धोरणात ही तरतूद आहे त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कामत यांनी केली. आमदार विष्णू वाघ यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून, प्रादेशिक भाषेतून किंवा परिसर भाषेतूनच व्हायला हवे, असे ठाम प्रतिपादन केले. सरकार कोकणी, मराठी शाळांना विद्यार्थ्यांमागे ४०० रुपये अनुदान देते त्याचप्रमाणे उर्दू व कन्नड शाळांनाही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारी शिक्षकांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची मुले शिक्षणासाठी सरकारी शाळांमध्येच पाठवणे सक्तीचे करावे, अशी मागणी वाघ यांनी केली. सरकारी शाळांच्या झालेल्या दुर्दशेकडे त्यांनी लक्ष वेधले. डायोसेझन संस्थांनी कोकणी माध्यम घेतले तेव्हाच कोकणीसाठी रोमी लिपी केली असती तर प्रश्न सुटला असता. ख्रिस्ती समाज रोमीतून कोकणी लिहितो तो कोकणीकडेच राहिला असता, असे वाघ म्हणाले. रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
माध्यम प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावा!
By admin | Published: July 27, 2016 2:00 AM