पणजी: आंतराष्ट्रीय ड्रग्स डीलर जाओ पेद्रो डुराटे ओलिवेरा सोऊ या ब्राझीलच्या गुन्हेगाराला गोव्यात विदेश विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. कडक सुरक्षेत त्याला म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे.
जाओ पेद्रो डयुराटे हा ब्राझीलमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणात अडकला असून अंमलीपदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे. त्याला पकडण्यासाठी ब्राझीलने सर्वत्र रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. इन्टरपोलच्या माध्यमातून त्याचा शोधही सुरू होता. तो भारतात आल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विदेश विभागाला यासंबंधी सूचना आली होती. त्यात संशयिताच्या भारतातील वास्तव्याबद्दल माहिती होती. विविध माध्यमातून त्याच्या मागावर असलेल्या तपास यंत्रणांना तो गोव्यात दाखल झाल्याचे आढळून आले. त्याने गोव्यात केलेला एटीएम मशीन्सचा वापर, फोनचा वापर हे त्याचा पत्ता शोधण्याचा महत्त्वाचा धागा ठरला.
मुंबई विदेश विभागाच्या कार्यालयातून गोव्याला या संबंधी माहिती मिळाल्यानंतर गोवा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला. त्याला पकडण्यात यशही मिळाले. दरम्यान त्याला नेमके कुठे पकडण्यात आले या विषयी अद्याप विदेश विभागाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही, परंतु उत्तर गोव्यात पकडले एवढे सांगण्यात आले आहे. पकडण्यात आल्यानंतर त्याला म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान जाओ पेद्रो ड्युराटे हा अत्यंत धोकादायक गुन्हेगार असल्यामुळे स्थानबद्धता केंद्रात ठेवलेले असतानाही त्याच्यावर करडी नजर ठेवण्याच्या सूचना केंद्राला देण्यात आल्या आहेत. त्याच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचाही वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान तो पकडला गेला त्यावेळी त्याच्याकडे ब्राझीलचा पासपोर्ट आणि कालमर्यादा ओलांडलेले भारताचे व्हिसापत्र सापडले. त्याला पकडल्याची माहिती ब्राझील देशाला देण्यात आली आहे.