नारायण गावस
पणजी: आंतराष्ट्रीय पर्पल फेस्टीवल २०२४ मोठ्या उत्हसात साजरा केला जाणार असून सरकारच्या सर्व खात्यांचा याला पाठींबा असणार आहे. हा महोत्सव दिव्यांग व्यक्तींची कला जागतिक पातळीवर नेणार. या उत्सवाचे उद्दिष्ट म्हणजे सीमा ओलांडणे आणि दिव्यांग व्यक्ती साठी प्रोत्साहन देणे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त कार्यालय आणि सामाजिक कल्याण संचालनालयातर्फे आंतराष्ट्रीय पर्पल फेस्टीवल येत्या ८ ते १३ जानेवारी या कालावधीत हाेणार आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, समाजकल्याण सचिव सुभाष चंद्रा, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि आयाेगाचे सचिव ताहा हझिक- उपस्थित होते. आंतराष्ट्रीय पर्पल फेस्ट जागतिक स्तरावर बदल घडवणारा आहे. विविध दृष्टीकोनांना एकत्र करून, प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण खऱ्या अर्थाने साजरे करणारे जग आम्ही निर्माण करू शकतो. पर्पल फेस्ट प्रज्वलित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल. सकारात्मक बदल दिव्यांगाना नवीन उंची गाठण्यास सक्षम बनवून आणि आपल्या राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपला उत्साह व्यक्त करताना म्हटले, हा महोत्सव गोव्याच्या चैतन्यमय, वैविध्यपूर्ण आणि स्वागतार्हतेला मूर्त रूप देतो. पर्पल फेस्टचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटतो. सर्वसमावेशक समाज असा आहे जो प्रत्येक व्यक्तीची अद्वितीय शक्ती आणि प्रतिभा ओळखतो आणि साजरे करतो. पर्पल फेस्टीवल हा केवळ एक सण नाही; तो एकता, समानता आणि समजूतदारपणासाठी एक आवाहन आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
आपल्या मुख्य भाषणात अमेरिकेतील गायक, रॅपर, गीतकार, संगीत निर्माता स्पर्ष शहा यांनी दिव्यांग व्यक्तींबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांनी अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांची कबुली दिली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रेम आणि एकतेच्या उदाहरणांवर प्रकाश टाकला.