पणजी: राज्य सरकारतर्फे शुक्रवारी राज्यभरातील विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह इतर मंत्री, आमदारांनी स्वतः उपस्थिती लावत आपापल्या मतदारसंघात योग दिन कार्यक्रम घडवून आणला. लोकांचा, व विविध योग संस्थाचा यावेळी चांगला प्रतिसाद लाभला.
राज्य सरकारचा मुख्य कार्यक्रम ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे पार पडला. सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. डॉ. सावंत यांनी यावेळी योग प्रशिक्षण मध्येही सहभाग घेतला. तर तालुका स्तरावरील कार्यक्रम सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत पार पडले. येथे इतर मंत्री, आमदारांनी हजेरी लावली.
योगा स्वतःसाठी आणि योगा समाजासाठी ही यंदाची योग दिनाची थीम आहे. त्यानुसारच राज्यभर योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्राचीन देण असलेले योग जगभर पोहचविले आहे. पूर्वी भारत केवळ काही ठराविक गोष्टींसाठी ओळखला जायचा, पण आता योग आणि आयुर्वेद यासाठी भारताची ओळख आहे. मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे १८० देश योग दिन साजरा करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
निरोगी आणि तंदरुस्त जीवन जीवनासाठी योग खूप आवश्यक आहे. कोविड नंतर आम्ही आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने खूप गंभीर झालो आहोत. जे नियमित योगासने करायचे तेच कोविड काळात लढू शकले. यातून योगासने किती महत्वाची आहे हे दिसून येते. योगा आणि प्राणायाम केल्याने डायबेटिस, कर्करोग, हायपरटेंशन यासारख्या वाढत चालेल्या रोगांपासून मुक्त होऊ शकतो. तसेच अंगात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते जी जीवनात खूप यशस्वी होण्यास मदत करते, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.