वासुदेव पागी
पणजी - विधानसभेच्या कामकाजाचे नियोजन हे वेळेची सांगड घालून केलेले असते. त्यामुळे सदस्यांना वेळेचे भान राखूनच बोलावे लागते. त्यासाठी सभागृहाच्या अध्यक्षांना वेळेचा कटाक्ष पाळण्यासाठी बेल वाजवावी लागली तरी ते अनुचित नसल्याचे गोव्याच्या विधानसभेत नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
फर्नांडीस यांच्या नावाची उपसभापती म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर सभागृहात त्यांचे कौतुक करताना अनेक सदस्यांनी त्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा अशी विनंती केली होती. त्यांनी लवकर बेल वाजवू नये अशी मागणी बऱ्याच सदस्यांनी केली होती. याविषयी विचारले असता फर्नांडीस म्हणाले, एका सदस्याने अधिक वेळ घेतला तर दुसऱ्यालाही किमान तितकाच वेळ द्यावा अशी मागणी होवू शकते. तसे केले तर कामकाज मध्यरात्रीपर्यंत लांबणार. अशाने सभागृहाचे काम चालणार नाही. त्यामुळे वेळेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी बेल वाजवावी लागली तर ती मारलीच पाहिजे.
सभापती व उपसभापती पदे ही लोकशाहीच्या मंदिरातील फार मोठ्या जबाबदारी असून उपसभापती पदाचा जबाबदार माझ्यावर सोपविल्यामुळे मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांचा ऋणी आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री असतात तर सभागृहाचे प्रमुख हे सभापती असतात व सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती असतात. त्यामुळे हे पद म्हणजे लोकशाहीच्या एका मोठ्या घटकाची जबाबारी ठरत आहे.’
या पदावर माझी निवड झाल्यानंतर मला माझे अपग्रेडेशन झाल्यासारखे वाटले. याचा अर्थ विधीमंडळ सदस्य म्हणजे कमी महत्तवाचे पद असे मला अजिबात म्हणायचे नाही, परंतु सर्व विधीमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारांच्या हीताच्या दृष्टीने आणि पर्यायाने गोमंतकियांच्या हितासाठी आपल्या समस्या सभागृहात मांडताना योग्य संधी व वातावरण निर्मितीची जबाबदारी माझ्यावर आली आहे असे त्यांनी सांगितले.
सभागृह चालविण्याची जबाबदारीही सभापतींच्या अनुपस्थित आपल्यावर राहाणार असल्यामुळे त्यावेळी जनतेच्या प्रश्नांना प्रतिनिधी वाट करून देतात हे पाहणे तसेच हे होताना कामकाज नियमांचे पालन करून घेणे हा कटाक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले. फर्नांडीस हे जरा कडवे परंतु स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या स्वभावाचा कामकाज चालविण्यात कोणताही अडथळा येणार नाही उलट फायदाच होणार असल्याचे ते सांगतात.