लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा करासवाडा- म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
या प्रकरणी तिघा संशयितांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यात निगेल फोन्सेका ( ४१ ), आलेक्स फर्नाडिस (५१) व लॉरेन्स मेंडिस (४०) यांचा समावेश होता. नंतर त्यांच्याविरोधात भादंसंच्या कलम २९५ (अ), १५३ (अ), ४२७ (३४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व संशयित म्हापसा परिसरातील असून त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी देण्यात आली होती. रविवारी रात्री हे कृत्य करण्यात आले होते, तर सोमवारी हा प्रकार निदर्शनाला आला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून करासवाडा तसेच आकय परिसरात त्यांनी गुंडगिरीने दहशत निर्माण केली होती. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, पुतळ्याची विटंबना करण्यासाठी त्यांनी दगडाचा वापर केला होता. दगडाचा वापर करुन पुतळ्याचेहऱ्यावर घाव घालण्यात आले होते. दरम्यान, म्हापशातील शिवप्रेमींनी काल, बुधवारी निरीक्षक सिताकांत नाईक यांची भेट घेतली.
तसेच संशयितांच्या झालेल्या तपासावर तसेच एकूण प्रकरणावर त्यांच्यासोबत विस्तारितपणे चर्चा केली. सुरू असलेला तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे सांगून तपास कार्यावर समाधान व्यक्त केले. तसेच पोलिसांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले.
असा लागला छडा
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. फुटेजची छाननी केली असता, निगेल फोन्सेका याच्या हालचाली संशयास्पद असल्याच्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता, या कृत्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे त्यांनी उघड केले होते. त्यानंतर इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते.