- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : गोव्यात एकाबाजुने अंमली पदार्थाची प्रकरणे वाढत असली तरी खुनाच्या घटना मात्र तुलनेत कमीच असून यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, खूनांच्या तपासाची टक्केवारीही यंदा चांगली आहे. आतापर्यंत मागच्या 11 महिन्यात झालेल्या 26 खुनांपैकी 25 खुनांचा तपास लावण्यात गोवा पोलीस यशस्वी झाले असून त्यामुळे त्यांच्या यशाची टक्केवारी 96.15 टक्के एवढी झाली आहे.
उत्तर व दक्षिण गोव्यात पहिल्या 11 महिन्यात प्रत्येकी 13 खुनांच्या घटनांची नोंद झाली असून त्यापैकी फोंडा येथे झालेल्या एका महिलेच्या खुनाचा तपास वगळता अन्य सर्व घटनांचा तपास पोलिसांनी लावला आहे. त्यातील कुडचडेच्या सुकोरिना त्रवासो हिच्या खुनाचा तपास तब्बल पाच महिने अडखळून पडला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयित श्याम देविदास हा मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर आला असताना त्याला अटक करण्यात आली. उत्तर गोव्यातील पर्वरी पोलीस स्थानकावर अशाचप्रकारे पवनकुमार या कामगाराच्या खुनाचा तपास सुमारे महिनाभर अडखळून पडला होता. मात्र, या प्रकरणातील संशयित दोन दिवसांपूर्वीच सातारा पोलिसांच्या हाती लागल्याने याही प्रकरणाची उकल झाली.
फोंडय़ातील खुनाचा तपास न लागण्यामागचे कारण स्पष्ट करताना, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले की, या खूनात ज्या महिलेचा प्राण गेला तीच नेमकी कोण याची ओळख न पटल्याने या खुनाचे कुठलेही धागेदोरे मिळू शकले नाहीत. 6 ऑगस्ट रोजी फोंडय़ातील बसस्टँडजवळ असलेल्या झाडीत या महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता.
उत्तर गोव्यात यंदा सर्वात जास्त खुनाच्या घटना कळंगूट पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्या असून एकूण चार खुनांच्या घटना या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्या. त्यातील गाजलेला खून म्हणजे 7 ऑगस्ट रोजी कांदोळी येथे विश्वजीत सिंग या दिल्लीतील हॉटेल व्यावसायिकावर हॉटेलच्याच पार्किग स्लॉटमध्ये तलवारीने हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली होती. या पाठोपाठ पेडणे आणि अंजुणा पोलीस स्थानकात प्रत्येकी दोन तर म्हापसा, पणजी, ओल्ड गोवा, वाळपई व पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एका खुनाची घटना घडली.
यापैकी पर्वरी येथे झालेला खून 8 नोव्हेंबरला झाला होता. येथील एका फुलाच्या नर्सरीत काम करणाऱ्या पवनकुमार या कामगाराच्या डोक्यावर दंडुक्याने वार करु आल्बन तोफो हा झारखंडचा संशयित नंतर पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी गोवा पोलीस झारखंडलाही जाऊन आले. मात्र, त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नव्हता. तरीही पर्वरी पोलिसांनी चिकाटीने त्याचा मोबाईलचा माग घेतला असता, तीन-चार दिवसांपूर्वी सातारा येथे त्याच्या फोनचे लोकेशन सापडल्याने पर्वरी पोलिसांनी त्याला रहिमतपूर पोलिसांच्या सहाय्याने अटक केली होती.
दक्षिण गोव्यात सर्वात अधिक खुनांच्या घटना कुडचडे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्या असून या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या तीनपैकी दोन घटना पोलिसांसाठी अधिक आव्हानात्मक होत्या. त्यापैकी पहिली घटना 2 एप्रिल रोजी गूढरित्या हत्या करण्यात आलेल्या बसूराज बारकी याच्या खुनाची होती. हा खून होऊन तब्बल एका महिन्याने या खुनाला वाचा फुटली होती. दुसरी घटना 6 जुन रोजी झालेल्या सुकोरिना त्रवासो या महिलेच्या खुनाची होती. संशयित श्याम देविदास यानेच हा खून केला असावा असा पक्का संशय असूनही तो पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे या खुनाचे गूढ उलगडले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्याला झालेल्या अटकेने या खुनाचाही तपास लावला गेला.
दक्षिण गोव्यात यंदा वेर्णा, कोलवा, मडगाव व वास्को या पोलीस स्थानकाच्या कक्षेत प्रत्येकी दोन खुनांच्या घटना घडल्या. तर फोंडा व कुंकळ्ळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एका खुनाची नोंद झाली. यापैकी फोंडय़ातील प्रकरण सोडल्यास इतर सर्व खुनांचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या या यशाबद्दल बोलताना दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले, प्रत्येक गुन्हय़ाचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला याची परत परत उजळणी घेतली गेल्यामुळेच पोलिसांना तपासात यश आले. कुडचडेच्याही खुनाच्या तपासात हीच पद्धती वापरण्यात आल्याने पाच महिन्यांनंतर खुनी सापडला. गुन्हय़ांच्या तपासाची प्रगती कुठपर्यंत पोहोचली याची माहिती प्रत्येक मंगळवारी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात होती. त्याशिवाय एलआयबीच्या पथकाबरोबरही महिन्यातून एकदा बैठक घेतली जात होती. सर्व पोलिसांनी उत्कृष्ट टीमवर्कने काम केल्यामुळेच पोलिसांच्या हाती हे यश आल्याचे ते म्हणाले.