लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: किनारपट्टीवरील रेस्टॉरंट मालक, हॉटेलवाले यांच्याकडून सरकारच्या नावे कथित खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या 'त्या' दोघांना चौकशीसाठी बोलावण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी स्वतःच ही माहिती दिली. कळंगुट, कांदोळी, बागा, हणजूण भागातील रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावे लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात येत असल्याचा आरोप करणारी पत्रे काही व्यावसायिकांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिली आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, माझी या प्रकरणात नाहक बदनामी केली जात आहे. माझ्या कुटुंबातील एकाही सदस्याने कधीही सरकारच्या कामात ढवळाढवळ केलेली नाही. माझे सरकार स्वच्छ आहे. काही राजकारणी वैफल्यग्रस्त होऊन बोगस तक्रारी करत आहेत. पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात कथित खंडणी मागणाऱ्या ज्या दोघांचा उल्लेख आहे, त्यांची कसून चौकशी करण्यात यावी, असे आदेश मी दिलेले आहेत. तसेच ज्यांच्या सहीने ही पत्रे पाठविली गेली आहेत, त्यांनाही बोलावून विचारणा करावी, असे निर्देश डीजीपींना दिले आहेत.
दरम्यान, हॉटेल व्यावसायिक नंदन कुडचडकर तसेच साहिल अडवलपालकर पोलिसांकडे अशी तक्रार केली आहे की, पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्रांमध्ये त्यांच्या आडनावांचा कोणीतरी गैरवापर केलेला आहे. पत्रावरील सह्या त्यांच्या नाहीत.
काय आहे तक्रार?
खंडणीराजचे हे प्रकरण गेले तीन-चार दिवस गाजत आहे. किनारपट्टीवरील रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये रात्री १० नंतर म्युझिक लावले जाते. तसेच निर्बंध असतानाही रात्री उशिरापर्यंत मद्य, जेवण पुरविले जाते, असा आरोप करून हे प्रकार चालू ठेवायचे असतील तर खंडणी द्यावी लागेल, असे सांगत दोघांनी रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप आहे. आमदार मायकल लोबो यांनीही खंडणीराजबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.
'तो' नंबर व्हिएतनामचा
खंडणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे जे पत्र व्हॉट्सअॅपवरून पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आले, तो मोबाइल क्र. व्हिएतनाममध्ये नोंदणी झालेला आहे. ८४३३४३६४१२१ या क्रमांकावरून १६ मार्च रोजी हे पत्र अनेक मोबाइलवर पाठवण्यात आल्याचे सायबर क्राइम विभागाला चौकशीत आढळून आले आहे. सायबर पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत. हे कृत्य सायबर गुन्हेगारांचे किंवा असंतुष्टांचे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी कृत्य असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
सरकारची बदनामी खपवून घेणार नाही
सरकारची बदनामी खपवून घेणार नाही. कथित खंडणी प्रकरणी ज्या दोन व्यक्तींची नावे पत्राद्वारे चर्चेत आली, त्यांना पोलिसांनी बोलावून घेऊन चौकशी करावी. उगाच सरकारचे नाव कुणी गोवू नये. -सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष
पणजी 'सोलर सिटी होणार
राजधानी शहरात दोन वर्षांत ८० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून, हे शहर 'सोलर सिटी' म्हणून जाहीर केले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील सर्व सरकारी इमारती, बंगले यांच्या छतांवर सौर पॅनेल्स बसवून वीज निर्मिती केली जाईल. शहराची विजेची गरज ८० मेगावॅट एवढी आहे. केंद्रीय अपारंपरिक उर्जा मंत्रालय व गेडा' यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाईल. कसिनो त्यांना लागणारी वीज अन्यत्र सोलर पॅनेल्स उभारुन करतील व तेथून त्यांना वीजपुरवठा केला जाईल. लोकांनी घरांवर सौर पॅनेल्स बसवून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करावी, याविषयी जनजागृती करण्यासाठी शहर व परिसरात रथ फिरणार आहे. या रथाला मुख्यमंत्र्यांनी बावटा दाखवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"