- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : फेलिक्स दहाल या फिनीश वंशीय स्वीडीश युवकाचा गुढ मृत्यू गोवा पोलिसांसाठी एक आव्हान बनले असून फेलिक्सने आपल्या दोन मित्रांकडे जयपूर येथे केलेल्या जमीनीच्या कथित व्यवहाराचा तपास आता काणकोण पोलिसांकडून केला जात आहे. फेलिक्सच्या मृत्यूपूर्वी त्याच्याबरोबर गोव्यात असलेल्या सन अविस्कार या कॅनेडियन व झियान द जानेरो या राजस्थानातील युवकांच्या पोलीस शोधात आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये गोव्यात आलेल्या या २२ वर्षीय स्वीडीश युवकाचा मृतदेह २८ जानेवारी २०१५ रोजी पाटणे काणकोण येथील रस्त्यावर सापडला होता. काणकोण पोलिसांनी सुरूवातीला हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र फेलिक्सची आई मीना पीरहोनेन हीने गोव्यातील न्यायालयात हे प्रकरण लावून धरल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१६ मध्ये काणकोण पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा नोंद होऊन वर्ष उलटले तरीही पोलिसांकडून फारसा तपास झालेला नाही, असा दावा करून पीरहोनेन यानी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठाकडे धाव घेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली असून विदेशी व्यक्तींच्या मृत्यूच्या तपासणीबद्दल तपास यंत्रणाना मार्गदर्शक तत्वेही घालून द्यावीत अशी मागणी या याचिकेत केली आहे.ही याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली असता त्या दोन संशयित युवकांचा अजुनही पोलिसांना शोध लागलेला नाही असे काणकोण पोलिसांनी न्यायालयाला कळवले आहे. मयताचे फोन डिटेल्स् यापुर्वीच पोलिसांनी मिळविले असून त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे़ या डिटेल्स्ची छाननी चालू असल्याचे काणकोणचे पोलीस निरिक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे़आतापर्यंत जो तपशील समोर आला आहे. त्याप्रमाणे विदेशात गे-स्ट्रीपर म्हणून काम करणा-या सन अविस्कार या कॅनेडियन युवकाबरोबर फेलिक्स गोव्यात आला होता. सननेच त्याची गाठ झियान द जानेरो याच्याकडे घालून दिली होती. त्यानंतर ते तिघेही गोव्याहुन जयपुरला रवाना झाले होते. जयपुरमध्ये असलेल्या एका अपार्टमेंटची विक्री करण्याचा त्या तिघांनी प्लॅन केला होता. या विक्रीतून येणा-या फायद्यातील १५ टक्के वाटा फेलिक्सला द्यायचे त्यावेळी कबूल केले होते. फेलिक्सने आपल्या या मित्रांना त्यावेळी २९०० युरोचे भांडवलही दिले होते. त्यानंतर पुन्हा गोव्यात ते तिघेही आले असता लवकरच फेलिक्सचा मृतदेह सापडला होता. या अपार्टमेंट विक्रीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा फेलिक्सच्या आईने दावा केला होता.या संबंधी काणकोणचे पोलिस निरिक्षक प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, जयपुरात कुठल्याही विदेशी व्यक्तीने जमीन किंवा मालमत्ते संदर्भात व्यवहार केले आहेत का या बद्दलचा तपशील आम्ही तेथील जमीन नोंदणी कार्यालयाकडे मागितला होता. मात्र त्या संदर्भात आम्हाला फारशी माहिती मिळू शकली नाही, असे त्यांनी सांगितले़