सुशांत कुंकळयेकर
मडगाव - गोव्यात सहलीसाठी आलेली असताना खून करण्यात आलेल्या आयरीश बॅगपॅकर डॅनियली मॅक्लॉग्लीन प्रकरणात आता खुद्द आयरीश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी लक्ष घातले आहे. सध्या गोव्यात चालू असलेल्या या प्रकरणातील सुनावणीच्या वेळी निरिक्षक म्हणून दिल्लीतील आयरीश दुतावासातील प्रतिनिधीची नियुक्ती केली जाणार आहे.
‘आरटीई’ या आयरीश व्हेब मॅगझिनने हे वृत्त दिले असून डॅनियलीची आई एंड्रीया ब्रेनीगन हिने आपली दुसरी मुलगी ज्योलेन हिच्यासह मागच्या आठवडय़ात प्रधानमंत्र्यांची डेरी येथील बिशप्स गेट हॉटेलमध्ये प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीत मुलीच्या खूनासंदर्भात चर्चा केली.
गेल्या वर्षी डॅनियली होळीचा सण साजरा करण्यासाठी दक्षिण गोव्यातील राजबाग- काणकोण येथील समुद्र किनाऱ्यावर उतरली असता 14 मार्च रोजी राजबागच्या निर्जन स्थानावर तिचा मृतदेह सापडला होता. तिचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कारही करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर काणकोण पोलिसांनी स्थानिक युवक विकट भगत याला अटक केली होती. सध्या दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे.
ही सुनावणी महिन्याला एकदा घेतली जाते. त्यामुळे या सुनावणीस हजर रहाणे आपल्याला अशक्य असल्याने आयरीश सरकारने आपल्याला या बाबतीत मदत करावी अशी मागणी डॅनियली आई एंड्रीया हिने वराडकर यांच्याकडे केली होती असे ‘आरटीई’ ने म्हटले आहे. त्यावेळी दिल्लीतील आयरीश दुतावासातील प्रतिनिधीची या कामासाठी नियुक्ती करु असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी त्यांना दिले. दर महिन्याला आम्ही दुतावासाच्या प्रतिनिधिला गोव्यात सुनावणीस हजर राहण्यासाठी पाठवू असे आश्वासन तिला देण्यात आले आहे.
डॅनियली आयरीश की ब्रिटीश नागरिक या बद्दल वाद निर्माण झाला होता. आयर्लंड व ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिकत्व असल्यामुळे मागच्या वर्षी डॅनिलयी गोव्यात ब्रिटीश पासपोर्ट घेऊन आली होती. या खून प्रकरणात आयरीस सरकारकडून आपल्याला मदत मिळावी अशी मागणी करणारा एक इमेल डॅनियलीच्या आईने आयरीश प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवला असता डॅनियली ब्रिटीश असल्याने आम्ही तिला मदत करु शकत नाही, त्यामुळे तुम्ही मदतीसाठी ब्रिटीश विदेश व्यवहार सचिव जेरेमी हंट यांच्याकडे संपर्क साधावा असे त्यांना या कार्यालयातून कळविण्यात आले होते. आयरीश सरकारच्या या भूमिकेमुळे डोनेगल प्रांतात संतापाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी एंड्रीया हिची प्रत्यक्ष भेट घेतली त्यावेळी आपल्या कार्यालयाकडून झालेल्या चुकीबददल त्यांनी माफीही मागितली असे या वृत्तात म्हटले आहे.