अॅड. शिवाजी देसाई, ब्रह्माकरमळी
लोकमतमधून फोन आला. सत्तरीच्या जंगलात ज्या आगी लागत आहेत त्यावर त्यांना लेख हवा होता आणि मी त्याचवेळी मोर्ले सत्तरी जंगलातील डोंगरावर जी आग लागली होती, तिथे मदतीसाठी निघत होतो. मी आणि माझा मित्र एशली पिंटो आम्ही दोघे मोर्ले सत्तरी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे वनखाते, अग्निशमन दल, आरोग्य खाते, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्या गाड्या उभ्या होत्या. डोंगरावरून जो धूर येत होता तो पायथ्याशीही स्पष्ट दिसत होता. वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधला आणि एकूण परिस्थिती जाणून घेतली. जिथे आग लागली होती तिथे आम्ही निघालो. तिथे जाणे जाण्यासाठी पायवाट आहे. अनेकजण आग विझवून दमले होते.आम्ही त्यांना पाणी, बिस्किटे दिली. एक लक्षात आले ते हे की आग विझवण्यासाठी काही गट तयार करण्यात आले होते. त्यात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचादेखील मोठा सहभाग होता. आग विझविण्यासाठी पाणी घेऊन हेलिकॉप्टरदेखील आले होते. परंतु त्यात पुरेसे पाणी नव्हते. आम्हाला डोंगराच्या पायथ्याशी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे काही युवक आगीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसले. नागरिकांना किंवा अग्निशमन दलाला डोंगरावर पाणी नेऊन आग विझवणे शक्य होत नव्हते. म्हणून जी गावातील पूर्वापार पद्धतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. ती पद्धत म्हणजे आग लागलेल्या जागेच्या जवळचा परिसर साफ करणे, त्याला ग्रामीण भाषेत रीस काढणे म्हणतात. म्हणजे जाळ रेषा तयार करणे, दुसरा प्रकार म्हणजे हातात ओल्या झाडाच्या फांद्यांचे टाळ घेऊन आग विझविणे. आग लागल्याच्या रात्री आणि पहाटेपासून वन खाते, नागरिक, पोलीस, इतर सर्व कर्मचाऱ्यांची आग विझवताना दमछाक झाली होती.
जंगलात आग लागते तेव्हा ती विझवण्यासाठी वनखाते सक्षम आहे का, हा खरा प्रश्न आहे. अशावेळी सरकार आणि सरकारमधील मंत्री वन अधिकाऱ्यांकडे बोटे दाखवतात. परंतु सरकारने वनखाते सक्षम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वनांचे संरक्षण हे वनखाते आणि लोक या दोहोंमधील संवादावर आणि विश्वासावर अवलंबून असते. जनता आणि वनखाते यांच्यात संवाद आणि त्याचबरोबर वन रक्षणासाठी जागृती होणे खूप आवश्यक असते. परंतु याबाबत कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक जण जेव्हा मोलें गडावर आग विझवत होते, तेव्हा वनमंत्री हेलिकॉप्टरमधून पाहणी करत होते. जे अधिकारी या आगीला जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई होणार असे सरकार म्हणत आहे. परंतु खरा प्रश्न हा आहे की वन खात्यामध्ये जी भरती होते, ती खरंच पारदर्शी आहे का? अनेकवेळा सर्व कायदे धाब्यावर बसवून पात्र नसलेले उमेदवार भरती केले जातात आणि हीच खरी शोकांतिका आहे. आज जंगल क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, तिचा उपयोग काय आहे, जंगलातील झाडांची झीज का होते, पर्यावरणीय दुष्परिणाम जंगलात होण्याची कारणे काय आहेत, जंगलात आग नैसर्गिकिरत्या लागली असेल तर का लागली? आणि माणसं लावत असतील तर का? या सर्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वन खात्याकडे टीम आहे का?
तसे पाहायला गेलो तर जगाच्या कानाकोपऱ्यातदेखील जंगलांमध्ये आगी लागत आहेत आणि त्याची अनेक कारणे आहेत. यातून आम्ही कधी बोध घेतलाय का? हा प्रश्न आहे. वनखात्याकडे जंगलातील आग रोखण्यासाठी स्वतंत्र फायर फायटर हवे आहेत. जंगलातील आगी रोखण्यासाठी वन खात्याला गोव्याच्या वनमंत्रालयाने आजपर्यंत कोणते ट्रेनिंग दिले? वनमंत्री आज हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत. वनमंत्री स्वतः सत्तरी तालुक्याचे आहेत. सत्तरीच्या जंगलात फिरून सत्तरीचे जंगल जाणून घेणे त्यांना कधी जमलेच नाही, हे वास्तव आहे. खरे म्हणजे आज वनखात्याने प्रत्येक गावात व्हॅन पाठवली पाहिजे. तिच्या माध्यमातून जंगलांमध्ये आगी लागू नयेत यासाठी जनजागृती केली पाहिजे. गावागावांमध्ये जसे आरोग्य शिबिरे होतात तसेच कँप वनांच्या सर्वेक्षणासाठी वन खात्याने घेतले पाहिजेत. गावात वनांच्या रक्षणासाठी ग्रामस्थांची समिती असायला हवी. या समितीला कायदेशीर अधिष्ठान असायला हवे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात फिरून सहा मीटर अंतरात जाळरेषा तयार करायला हव्यात. मोर्ले गडावर जेव्हा आग लागली, तेव्हा लक्षात आले की आग विझविणाऱ्यांना रसद पुरविणे कठीण होते. कारण पायवाटेने जावे लागत होते. जंगलात आपत्ती आल्यावर रसद पुरवता आली पाहिजे. प्रत्येक जंगलात पेट्रोलिंग करायला वनखात्याला सोपे झाले पाहिजे, आवश्यक ठिकाणी वनखात्याचा कंट्रोल असलेले रस्ते तयार होणेही आवश्यक आहे.
वनभागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात देशी वृक्षलागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोत शोधून बाजूला तळी, तलाव, पाणवठे निर्माण करायला हवेत. या तळी, तलाव पाणवठ्यांचा उपयोग आग विझविण्यासाठी होऊ शकतो. अनेक लोक रात्रीच्या वेळी जंगलातून हातात पेटलेले टेंभे घेऊन फिरतात. रात्रीच्या वेळी कुठेही आगीचा छोटीशी ठिणगी उडाली तरी जंगलात आग लागून ती पसरण्याची शक्यता असते. अशा लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. सत्तरी तालुक्यातील जंगलांना आगी का आणि कशा लागल्या त्याचा तपास होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोक जागृती देखील व्हायला हवी. गोव्याचे वनखाते सक्षम बनवणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
एक गोष्ट लक्षात आली की हेलिकॉप्टरमधून पाणी ओतून आग विझत नव्हती. त्यासाठी नौदलाचे पाण्याचे फवारे हेलिकॉप्टरमध्ये असणे आवश्यक होते. तसेच आग लागली त्याचवेळी ड्रोन कॅमेऱ्याने आग कुठे लागली हे टिपणे देखील गरजेचे होते. अशा प्रकारचे ड्रोन कॅमेरे वनखात्याकडे आहेत का हादेखील संशोधनाचा विषय आहे. आज आपण आधुनिक युगात आहोत. आपत्ती येते तेव्हा त्रुटीदेखील नजरेस येतात. म्हणून वन खात्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"