पणजी : महामार्गांच्या बाजूची पाचशे मीटरमधील बार व दारूची दुकाने हटविण्याच्या आदेशावरून राज्यातील दारू व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. सरकारने याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर आम्ही प्रसंगी महामार्गांवर उतरून वाहतूकही रोखू, असा इशारा गोवा मद्य व्यापारी संघटनेतर्फे शनिवारी दिला. बार बंद केले तर, सुमारे चार लाख गोमंतकीयांच्या उपजीविकेवर गदा येईल आणि ७० टक्के व्यवसाय नष्ट होण्याचा धोका संभवतो, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यास अनुसरून येत्या १ एप्रिलपासून महामार्गांच्या बाजूचे बार व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करायचे नाही, असे अबकारी खात्याने ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथे शनिवारी गोवा मद्य व्यापारी संघटनेची व्यापक बैठक झाली. सुमारे ५०३ सदस्य या बैठकीस उपस्थित राहिले. नाईक यांच्यासह संघटनेचे कायदा सल्लागार अॅड. पालेकर, पदाधिकारी प्रवीण केरकर, विवेक केरकर, सॅड्रीक वाझ, मारियो सिक्वेरा, दिनेश केनावडेकर, इनासिवो डिसोझा, मंगलदास नाईक आदी या वेळी व्यासपीठावर होते. संघटनेने एकूण बारा सदस्यीय समिती शनिवारी स्थापन केली व महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमध्ये किती दारू दुकाने आहेत ते निश्चितपणे आठवडाभरात शोधून काढण्यास या समितीला सांगितले आहे. बारा तालुक्यांतील प्रत्येकी एक सदस्य समितीवर घेतला आहे.बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आम्हाला मान्य नाही. महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरातील दारू दुकाने व बार हटविण्याचा निवाडा देण्यापूर्वी आमचे कोणाचेच म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. आम्हाला नोटीसही दिली गेली नाही. त्यामुळे या धंद्यातील सगळे गोमंतकीय अडचणीत आले आहेत. सरकारने यावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे नाईक यांनी सांगितले. येत्या ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल त्या सरकारकडे आम्ही विषयाचा पाठपुरावा करू, असेही नाईक यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
दारू दुकानांचा मुद्दा पेटणार
By admin | Published: February 12, 2017 1:26 AM