मयुरेश वाटवे, वरिष्ठ साहाय्यक संपादक
भक्त पुंडलिकाची कथा ऐकत ऐकतच आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे ती कथा सर्वश्रुत आहे. आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकावर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विष्णू दारी आले असता आईवडिलांच्या सेवेची गोडी लागलेला पुंडलिक त्याच्या पुढ्यातील वीट काढून विष्णूसमोर टाकतो आणि म्हणतो, "आता मला वेळ नाही, तू याच्यावर जरा उभा राहा." आणि म्हणे २८ युगांसाठी श्री विष्णू विठ्ठल रूपात पंढरपुरी उभा आहे. आजही विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याचे दर्शन घेण्यापूर्वी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास तो पावत नाही अशी मान्यता आहे.
सध्या गोव्यात भक्त पुंडलिकांची नवी जमात तयार झाली आहे. त्यांना कसली 'गोडी' लागलीय किंवा ते कसली 'सेवा' करण्यात मग्न आहेत माहीत नाही, पण त्यांनी मंदिराबाहेर एकेक 'वीट' टाकून आपापल्या देवांना तिष्ठवलेले आहे. देवांना वेठीस धरलेल्या या भक्त (?) पुंडलिकांनी सामान्य भाविक आणि त्यांच्या देवाची ताटातूट केलेली आहे. "देवांचं काय करायचं ते आम्ही ठरवणार, तुम्ही लुडबूड करणारे कोण?" असा प्रश्नही ते विचारत आहेत. म्हणजे देणग्या, दानपेटी भाविकांनी भरायची आणि देवावर दादागिरी हे 'पुंडलिक' करणार. आता त्यांनाही वाटू लागलंय की देवाचं दर्शन घेण्यापूर्वी लोकांनी आपल्याला सलाम करावा. पण खरा 'पुंडलिक' ठरत नाही आहे!
हे पुंडलिक की झारीतील शुक्राचार्य आहेत, माहिती नाही. पण अनेक देवस्थानांना त्यामुळे टाळे लागले आहे. मंदिरे ही गावातील सांस्कृतिक केंद्रे आहेत. मंदिराचा कब्जा कोणत्याही जातीच्या लोकांकडे असू दे. पण सर्व जाती-धर्माचे भाविक त्या देवाला भजत असतात. आमच्या गावचा देव हा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला असतो, त्याच्या सण समारंभाला, जत्रा-काल्यांना गावातील प्रत्येक जण झटत असतो. आपल्या सग्या सोयऱ्यांना 'आमच्या' देवाच्या जत्रेला या अशी निमंत्रणे जात असतात. म्हणून मंदिरे आणि देव ही काही फक्त कमिटीवरच्या लोकांची मक्तेदारी नाही.
काही आर्थिक वाद असतील, मानपान असतील ते तुमच्या पातळीवर मिटवा, त्यासाठी देवाला आणि लोकांना वेठीस धरू नका. मंदिरांतील देव महत्त्वाचा आहे. कमिटी ही केवळ त्याच्या दैनंदिन कारभाराची विश्वस्त (पण सध्या सगळीकडे विश्वस्तधात सुरू आहे) आहे.
देवांना गर्भगृहात कैद करणारे हे 'कंसमामा', 'शिशुपाल' कोण? त्यांना काय अधिकार आहे? घरच्या पैशांतून त्यांनी मंदिर बांधले असेल तर त्यांनी आपल्याला हवे तेव्हा मंदिर उघडावे, बंद करावे. सार्वजनिक मंदिरांबाबत असे करता येणार नाही. त्यांना तो नैतिक अधिकार नाही. आणि काही कुटुंबांनी मंदिरे बांधली असली तरी ती शेवटी लोकांसाठी आहेत. त्यावर काही प्रमाणात त्यांचे नियंत्रण समजून घेता येईल. पण समस्त गावकऱ्यांची आस्था, श्रद्धा असणाऱ्या मंदिरांना/उत्सवांना मनमानीपणे बंद करणे योग्य नाही.
वारंवार होणाऱ्या या मुजोरीला आता खुद्द देवच 'वीट'लेला असेल. त्याला आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात ठेवून एकतर लोकांनी या मंदिरांत जाणे बंद करावे किंवा या मंदिरातील देवांना तरी मुक्त करावे.