मडगाव : ख्रिस्ती बांधवांच्या पवित्र सप्ताहात ( होली व्हिक) गोवा विधानसभेचे अधिवेशन घेण्याचा भाजप सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. गोवा राज्य धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असुन, भाजपने सर्व धर्म समभाव शिकावा असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
अधिवेशन काळात ख्रिस्ती धर्मियांचा पवित्र सप्ताहाला रविवार दि. २८ मार्च रोजी सुरूवात होत असुन रविवार दि. ४ एप्रिल रोजी ईस्टर संडे आहे. गुरूवार दि. १ एप्रिल रोजी मोंडी थर्सडे असुन, त्या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार आहे. अत्यंत बेजबाबदारपणे विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ ठरविण्यात आल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
गोवा विधानसभेचे आगामी अधिवेशन बुधवार दि. २४ मार्च रोजी सुरू होत असुन ते सोमवार १२ एप्रिल पर्यंत चालणार आहे. परंतु, या अधिवेशनात केवळ बारा दिवस कामकाज चालणार असुन, मध्ये आठ सुट्ट्या आहेत असे दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणुन दिले. भाजप सरकारने जनतेप्रती आपल्या असंवेदनशीलतेचे परत एकदा प्रदर्शन केले असुन, प्रत्येक सरकारने लोकभावनां तसेच धार्मिक भावनां प्रती संवेदनशीलता दाखविणे हे त्यांचे कर्तव्य असते असे दिगंबर कामत यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाने २१ दिवसीय कामकाजाचे विधानसभा अधिवेशन घ्यावे अशी मागणी सातत्याने केली असुन, विरोधी सदस्यांना जनतेचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी वेळ मिळणे गरजेचे आहे. भाजप सरकार लोकांचा आवाज दाबू पाहत आहे हे आता परत एकदा उघड झाले आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मी हे मुद्दे मांडणार असुन, सरकारला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडणार आहे. विरोधी सदस्यांना आवश्यक वेळ मिळण्यासाठी सरकारने कालावधी वाढवावा यावर सुद्धा जोर देणार असल्याचे दिगंबर कामत यांनी सांगीतले.