लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षासाठी काम करीत असल्याचे दाखवले. तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी नेमके विरोधात काम केले, असा आरोप केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी केला आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांचा पराभव झाला. केपेतून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याचे म्हटले जात आहे. यावर 'मी विद्यमान आमदार नाही. त्यामुळे मताधिक्यात थोडाफार फरक हा पडणारच. मात्र, काँग्रेसला केपेतून मिळालेले मताधिक्य घटले आहे', असे त्यांनी सांगितले. कवळेकर म्हणाले की, कॅप्टन विरियातो फर्नाडिस हे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीच सुचवलेले उमेदवार आहेत. कारण, काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीपासून एल्टन हे विरियातोंसोबत प्रचार करीत होते.
त्यांनी या निवडणुकीसाठी बरीच मेहनत घेतली होती. उलट, विधानसभा निवडणुकीसाठी एल्टन यांनी जितके काम होते, कदाचित त्यांनी त्यापेक्षा जास्त काम विरियातोंसाठी केले. तरीही, विरियातोंचे मताधिक्य कमी झाले, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीसाठी काम करत असल्याचा आव आणला. पक्षाला पूर्ण पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्र्यांनासुद्धा सांगितले. तसे दाखवलेसुद्धा. प्रत्यक्षात त्यांनी निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले. आता हे लोक कोण हे केपेच्या लोकांनाच विचारावे.'
आमदार डिलायला लोबो यांनीही ओढली बाबूंची री
शिवोली मतदारसंघात काही भाजप नेत्यांनी विरोधी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळेच या मतदारसंघात भाजपची आघाडी घटली आहे, असा दावा शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी केला आहे.
मतमोजणी चालू असताना आमदार डिलायला लोबो या एकमेव आमदार मतमोजणी केंद्रावर आल्या. आपल्या मतदारसंघात भाजपला आघाडी दिल्याबद्दल लोकांचे त्यांनी आभार मानले. त्या म्हणाल्या की, 'परंतु ही आघाडी आणखी वाढली असती. काही स्थानिक भाजप नेत्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी काम केल्यामुळे आघाडी कमी झाली,' असा दावा त्यांनी केला. 'हे विरोधी पक्षासाठी काम करणारे नेते कोण? ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत काय?' असे विचारले असता त्या म्हणाल्या की, 'त्याविषयी काही न बोललेले बरे.'