पणजी : ‘आपल्याला सरकारमध्ये घ्या म्हणून विजय सरदेसाई हे कधीच भाजपाकडे गेले नाहीत. उलट एका व्यक्तीला जेव्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, तेव्हा तेच दिल्लीत येऊन सरदेसाईंच्या पुढे भाजपाला पाठिंबा देण्यासाठी भीक मागत होते. याबाबतचे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. त्यामुळे यापुढे आमच्या पक्षावर किंवा पक्षप्रमुखांवर आरोप करताना सांभाळून बोलावे,’ असा सज्जड इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख विकास भगत यांनी दिला. पणजीत गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेस गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा प्रमुख दीपक कळंगुटकर व संतोषकुमार सावंत उपस्थित होते.
गोवा फॉरवर्डचे विकास भगत म्हणाले की, विजय सरदेसाई हे गेल्या काही महिन्यांपासून सरकारमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपा प्रवक्ता गिरीराज पै यांनी केला आहे. पण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी नकार दिल्याने ते आले नाहीत असे ते सांगतात. मात्र या आरोपात काहीच तथ्य नाही. उलट भाजपा आमच्याकडे पाठिंब्याची भीक मागायला आला होता. त्याचे पुरावेदेखील आहेत. जे स्वत: भाजपमध्ये पगारावर आहेत आणि ज्यांना अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे दोन साक्षीदार मिळत नाहीत, निदान त्यांनी तरी सरदेसाईंवर बोलण्याचे टाळावे. यापूर्वी मी पै यांना त्यांची लायकी दाखवून दिली होती आणि मी त्यांना आताही सांगतो की, त्यांनी गोवा फॉरवर्डविरुद्ध बोलताना शंभरवेळा विचार करावा.
भगत म्हणाले की, ‘२०२७ च्या निवडणुकांमध्ये आम्ही आमची क्षमता दाखवू. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. गिरीराज पै हे भाजपामध्ये येण्यापूर्वी फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नस (फॉग) अशी काहीतरी संस्था चालवायचे. त्यात ते अनेकांवर आरोप करायचे. पण ज्यांच्यावर आरोप करायचे, तेच आता भाजपामध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत यावर पै यांनी आधी स्पष्टीकरण द्यावे व नंतरच आमच्या पक्षावर बोलावे. भगत म्हणाले की, गोवा फॉरवर्ड केवळ फातोर्डा फॉरवर्डपुरता मर्यादित आहे. विजय सरदेसाई सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक बोलतात, असे आरोपही भाजप करीत आहे. पण भाजपाने हे समजून घ्यावे की, सध्या आमचा एकच आमदार असला, तरी तो संपूर्ण राज्याचे विषय मांडत आहे. ही क्षमता इतर पक्षांकडे नाही.