लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : खाण घोटाळाप्रकरणी अटकेतील ट्रेडर फिलीप जेकब याचे बँक व्यवहार तपासले असता, खाणमालकाला त्याच्याकडून २00 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पोच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणमालकाने वेगवेगळ्या लिज क्षेत्रातील डंप येथे टाकला होता आणि २00९ ते २0११ या कालावधीत तत्कालीन खाण मंत्रालयाच्या संगनमताने जेकब याच्यामार्फत स्वामित्त्वधन (रॉयल्टी) न भरताच निर्यात केले. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वाघुस, पाळे येथील डंपला भेट दिली. जेकब याने दिलेल्या जबानीत याच ठिकाणहून १0 लाख मेट्रिक टनांहून अधिक खनिज त्याने खरेदी केले होते व त्यासाठी त्याने तब्बल ३00 कोटी रुपये मोजले होते. एसआयटीचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकामासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाबरोबर खाण अधिकारीही उपस्थित होते. या ठिकाणी अजूनही लाखो मेट्रिक टन खनिज आहे. खाण खात्याने या डंपची आधी पाहणी केली नव्हती. गोव्यातील खाणमालकांशी संधान साधून खनिजमाल निर्यातीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा बेकायदा व्यवहार जेकब याने केल्याचा संशय आहे. गोव्याहून मोठ्या प्रमाणात खनिज बेकायदेशीरपणे त्याने निर्यात केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या अटकेमुळे बेकायदेशीर खाण प्रकरणात अडकलेल्या गोव्यातील खाण कंपन्यांत हलकल्लोळ माजला आहे. खाण खात्यात ट्रेडर म्हणून अधिकृतरीत्या त्याने नोंदणी केली नव्हती. त्यामुळे रॉयल्टी फेडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता आणि खाण खातेही त्याकडे डोळेझाक करीत होते, असे एसआयटीचे म्हणणे आहे. या ट्रेडरला खनिजाची विक्री करणाऱ्या खाण कंपन्याही आता एसआयटीच्या रडारवर आल्या आहेत. जेकब हा खाण खात्याकडे नोंदणी न केलेला ट्रेडर आहे, हे ठाऊक असतानाही गोव्यातील बऱ्याच खाणमालकांनी त्याला खनिजमाल विकला. त्यामुळे एक रुपयाही रॉयल्टी सरकारी तिजोरीत न जाता लाखो मेट्रिक टन खनिजमाल निर्यात केला गेला. परिणामस्वरूप खाण खात्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.
जेकबचे २०० कोटींचे व्यवहार
By admin | Published: July 15, 2017 2:12 AM