पणजी - तुरुंगात सर्व काही वाईटच घडत असते असे मुळीच नाही. किंवा तुरुंगात पोहचणारे सगळेच कायमचे गुन्हेगार असतात असेही काही नाही. काही कैदी तर एवढे चांगले वागतात की ते शिक्षेचा काळ संपवून जेव्हा तुरुंग सोडून जात असतात तेव्हा डोळ्य़ात पाणीही येत असतं, अशा शब्दात विठ्ठल गावस ह्या तुरुंग अधिका:याने अनुभव कथन केले व प्रेक्षकही मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले.
कोलवाळमध्ये तुरुंगअधिकारी म्हणून काम पाहणारे गावस म्हणाले, की काही कैद्यांचे तुरुंगातील वर्तन खूप चांगले असते. काहीजणांनी गुन्हा केला होता हे देखील खरे वाटत नाही. काहीवेळा काही चांगले कैदी तुरुंग सोडून जाताना ते जाऊ नयेत असं देखील अधिका:यांना वाटतं. एवढे त्यांच्याशी नाते तयार झालेले असते. काहीवेळा कैदी तुरूंग सोडून जाताना अधिका:याच्या पायावर डोके ठेवून आपल्याला जावे असे वाटत नाही असे देखील आपुलकीने सांगतात.
गावस म्हणाले, की तुरुंगात राहून काही कैदी उच्च शिक्षण घेतात. काहीजण चित्रकला व अन्य कलांमध्ये रममाण होतात. मी स्वत: गायन करतो. मला संगीताची व भजनाची प्रचंड आवड असल्याने कैद्यांसाठीही भविष्यात तुरुगांत भजनाच्या वर्गाची व्यवस्था करावी असा विचार मनात येतो.
सत्तरी तालुक्यातील साहित्यमंथन संस्थेतर्फे केरी-सत्तरी येथे आयोजित आम्ही घडलो, तुम्ही सुद्धा घडाना या कार्यक्रमप्रसंगी गावस बोलत होते. आपला स्वत:चा प्रवासही गावस यांनी सांगितला. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर आपल्याला आईने आणखी शिकू नको, काम कर अन्य भावंडांनाही शिकू द्या, असा सल्ला दिला होता. मात्र आपल्याला शिक्षणाची आवड होती. आपले वडील मजुरी करायचे. त्यांनीही आपल्याला पुढे शिकण्याचा सल्ला दिला. मी बारावीर्पयत शिकलो आणि मग कॉलेजमध्ये शिकण्याकरिता आर्थिक प्राप्ती व्हावी या हेतूने रोज रात्री सत्तरीतीलच एका औद्योगिक वसाहतीतील रात्रपाळीच्या कामाला जाऊ लागलो. रोज मी रात्रीच्यावेळी नोकरी करायचो व सकाळी महाविद्यालयात जायचो. अशा प्रकारे पदवीर्पयतचे शिक्षण घेतले व मग तुरुंगअधिकारी म्हणून नोकरीला लागल्याचे गावस यांनी नमूद केले.
शिक्षक संजय गावकर, मत्स्य खात्याचे अधिकारी प्रदीप गावस, राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्यासोबत एकेकाळी काम केलेले सामाजिक कार्यकर्ते गिरीश साळवे यांनीही यावेळी आपली वाटचाल व अनुभव सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणो म्हणून कणकवली येथील साहित्यिक मोहन कुंभार उपस्थित होते. लोकमतचे ब्युरो चिफ सदगुरू पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गोवा विद्यापीठाचे कोंकणी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पर्येकर, संयोजक नमन सावंत, कार्यक्रमाचे यजमान गणोश शेटकर, गोपिनाथ गावस, राघोबा लवू पेडणोकर, ङिालू गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.