लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेनुसार प्रत्येक ठिकाणी जन औषधी केंद्र असायला हवे. जेनेरिक औषधेही उत्तम चाचणी केलेली असतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक आरोग्य केंद्रात जन औषधी केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ येथे प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार विजय सरदेसाई, एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई, एम. एस. राजेंद्र बोरकर व आरोग्य संचालिका गीता काकोडकर उपस्थित होत्या.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आयसीयू असून त्यासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. योग्य डॉक्टर, नर्स यांची आवश्यकता आहे. रिलायन्स फाउंडेशन यांच्याकडे प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न चालला आहे. या इस्पितळातील प्रत्येक खाटेवर देखरेख ठेवली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात काही कारणास्तव काही गोष्टी राहून गेल्या आहेत. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून येथील रिक्त पदे ताबडतोब भरण्यात येईल. आमदार सरदेसाई यांना या इस्पितळाबाबत काळजी वाटणे स्वाभाविक आहे. आता सरकार या इस्पितळात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा देण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.
दक्षिण गोवा इस्पितळात प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे ही आनंदाची बाब आहे. पण मी या इस्पितळाबाबत याचिका दाखल केली असून हे दक्षिण गोवा इस्पितळ हा एक पांढरा हत्ती बनलेला आहे. मात्र, सरकारने आता या इस्पितळाचा गांभीर्याने विचार करून तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
जर भाजप दक्षिण गोवा जिंकू इच्छित असेल तर त्यासाठी हे इस्पितळ मतदानापूर्वी अद्ययावत करणे गरजेचे आहे. या इस्पितळाचा विषय विधानसभेत मांडला. त्यासाठी मी गोंधळही घातला पण काहीच झाले नाही. म्हणून न्यायालयात जावे लागले आहे. या याचिकेवर सुनावणी होईल त्यावेळी सरकार आपली बाजू मांडणार आहे. तेव्हा हे इस्पितळ सोयीसुविधांनी युक्त बनवावे, असे सरदेसाई यांनी सांगितले.