लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान आहे. १९५५ साली जगन्नाथराव जोशी तसेच जनसंघाच्या अन्य नेत्यांनी गोवा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला हे विसरून चालणार नाही,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. रविवारी भाजप स्थापना दिनानिमित्ताने येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्यात ट्रिपल इंजिनने विकासाची घोडदौड चालूच ठेवली आहे. गेल्या पन्नास वर्षांत झाला नाही एवढा विकास दहा वर्षांत झाला. राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय व नंतर आपण अशा विचारधारेने भाजपचे कार्यकर्ते नेते तसेच काम करत आहेत. पुढील शंभर वर्षे भाजप राजकारणात राहावा, यासाठी तळागाळात कार्यकर्ते काम करत आहेत. लवकरच गोव्यातील कार्यकर्त्यासाठी कदंब पठारावर सुसज्ज असे नवीन कार्यालय सुरू होणार आहे.' कार्यक्रमास व्यासपीठावर पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हेही होते. तसेच आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार राजेश फळदेसाई, आमदार जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'भाजपने देशात सुराज्य व रामराज्य आणले. राम मंदिर उभे केले. दुसऱ्या पिढीचा नेता म्हणून गोव्यातील जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. असंख्य कार्यकर्ते व मतदार यांच्या बळावरच आम्ही पुढे जात आहोत.' सावंत म्हणाले की, 'भाजपने अखंड भारताचे स्वप्न पाहिले. जनसंघासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंतचे कार्य, देशात रामराज्य यावे यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. लाखो कार्यकर्त्यांनी रामराज्यासाठी त्याग केला. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अखंड भारताचे स्वप्न भाजपने पूर्ण केले. 'एक विधान, एक प्रधान, एक निशान' ही संकल्पना सत्यात आणली. जम्मू-काश्मीरमध्ये दोन देशांचे झेंडे लागत होते. ३७० कलम रद्द करून भाजपने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' अशी अखंडता आणली.'
काँग्रेसकडून तुष्टीकरण : श्रीपाद नाईक
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, 'काँग्रेसने केवळ व्होट बँकेसाठी तुष्टीकरण केले. घटना पायदळी तुटून आणीबाणी लादली, परंतु जनतेने त्यांना धडा शिकवला. काँग्रेसमुळेच देशावर वाईट परिस्थिती ओढवली. भाजपने घटनेशी कधीही छेडछाड केली नाही, तसेच कधी विचारधाराही सोडलेली नाही. लोकसभेत दोन खासदार येथून सुरू झालेला प्रवास बहुमतावर पोहोचला आहे.
दामू यांच्याकडून जुन्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख
'भाजपच्या वाटचालीत जुन्या नेत्यांचे मोठे योगदान आहे' असे सांगून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, '२०४७ मध्ये भारत विश्व गुरू होणार व पहिल्या क्रमांकावर पोचणार हे निश्चित. त्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करूया व पक्षाला जास्तीत जास्त उभारी देऊया.' ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाल्यानंतर पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयीपासून जे. पी. नड्डांपर्यंतचा प्रवास दामूंनी सांगितला. पक्षाची स्थापना झाल्यानंतर गोव्यातही काशिनाथ परब, दादा आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, भालचंद्र बखले, दत्ता भि. नाईक, जी. वाय. भांडारे यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. जनसंघाची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागासमोर मी नतमस्तक होतो.'