लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी 'जनता दरबार' भरविण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्री या दरबारात उपस्थित राहून जनतेची गान्हाणी ऐकतील आणि समस्या सोडवतील.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष व अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आल्यानंतर काही तासातच सर्वसाधारण प्रशासन विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने लोकांपर्यंत जा, त्यांचे प्रश्न सोडवा, असे स्पष्ट आदेश शाह यांनी मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.
३ जुलै रोजी पहिल्या सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, म्हापसा येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी - ३ यांच्या कार्यालयात तर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मडगाव येथे माथानी साल्ढाना प्रशासकीय संकुलात लोकांची गान्हाणी ऐकतील. सर्व सरकारी खात्यांचे प्रमुख तसेच अधिकारी यांनी जनता दरबारमध्ये उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत.
आता लोकांशी कनेक्ट राहण्यावर भर
सरकार दरबारी कामानिमित्त लोकांचा कायम संपर्क येणाऱ्या अधिकायांनी 'जनता दरबार मध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. लोकांशी कनेक्ट राहण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ डिसेंबर रोजी ते मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री तसेच सत्ताधारी आमदारांना दिला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन महिन्यांपूर्वीच फर्मागुढी येथे जाहीर सभा झाली, तेव्हाही शहा यांनी लोकांकडे जा, त्यांच्या समस्या सोडवा असा सल्ला दिला होता.