लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्र्यांचा जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक आपल्या समस्या, कामे घेऊन येतात. गणेश चतुर्थीनिमित्त काही दिवस बंद असलेला जनता दरबार शनिवारपासून साखळी येथे पुन्हा सुरू झाला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.
या जनता दरबारात वेगवेगळ्या भागातून लोक नोकरी, बदली, सामाजिक आणि कामे वैयक्तिक कामे घेऊन येतात. दरबारात मुख्यमंत्री प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक निवेदन अर्जाची तपासणी करून त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे आज जनता दरबार खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत असल्याची भावना राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
सहज उपलब्ध होणारे मुख्यमंत्री अशी ख्याती असलेले डॉ. सावंत यांना गणेश चतुर्थीनिमित्त शेकडो लोक त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन संवाद साधून गेले होते. जनता दरबारात लोकांचे प्रश्न सुटतात. त्यामुळेच लोक वेगवेगळ्या भागातून नियमित या ठिकाणी येत असतात. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आपल्या साखळीतील निवासस्थानी सकाळी घरातून निघण्यापूर्वी किमान दीडशे ते दोनशे लोकांना आवर्जून भेटतात. त्यांच्या समस्या समजून घेतात.