पणजी - ट्रेड युनियन परिषदेतर्फे दिलेल्या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देऊन गोव्यात खासगी प्रवासी बसमालक आपल्या बसगाड्या ९ जानेवारीला बंद ठेवणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून ९ जानेवारीला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गोव्यातही प्रतिसाद दिला जाणार असल्याचे आयटकने म्हटले आहे. विशेष करून गोव्यातील रस्त्यांवर धावणा-या खासगी बसगाड्या त्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. खासगी बसमालक संघटनेचे महासचीव सुदीप ताम्हणकर यांनी ही माहिती दिली.
स्पीड गर्व्हर आणि इतर खासगी बस व्यावसायिकांच्या विरोधी धोरणामुळे या संपाला प्रतिसाद दिला जाईल असे त्यांनी सांगितले. ८ जानेवारी पणजीत होणा-या जाहीर सभेलाही बस व्यावसायिक उपस्थित राहतील आणि दुस-या दिवशी बसगाड्या बंद ठेवून संपात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.
संपाला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे आयटकचे सरचिटणीस सुहास नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. खाजगी आस्थापने बंद राहील. संपाची नोटीसही देण्यात आलेली आहे असे ते म्हणाले. कामगार नेते अजितसिंह राणे यांनीही लोकांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारनेते ख्रिस्तोफर फोंसेको यांनीही संपाला पाठींबा देण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे.